पनवेल एलआयसीची इमारत धोकादायक
पनवेल ः बातमीदार
ग्राहकांना वेगवेगळ्या विम्याच्या माध्यमातून भविष्याची चिंता न करण्याचा सल्ला देणार्या एलआयसीचे कार्यालयच धोकादायक इमारतीत सुरू आहे. पनवेल एलआयसीचे कामकाज महापालिकेने धोकादायक ठरविलेल्या पनवेल शहरातील एका इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू आहे. स्वत:सोबत ग्राहकांचा जीव धोक्यात टाकणार्या एलआयसी व्यवस्थापनाने लवकरात लवकर इमारत स्थलांतरित करण्याची गरज आहे.
’जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी’ असे ब्रीदवाक्य घेऊन कारभार करणार्या एलआयसीचे पनवेल शहरात पुणे-मुंबई महामार्गाला लागून कार्यालय आहे. तीन मजल्यांची ही इमारत एलआयसीने भाडेतत्त्वावर घेतली असून इमारतीच्या मालक प्रमिला अविनाश कवळे या आहेत. भूखंड क्रमांक 126वर ही इमारत आहे. अनेक वर्षांपासून पनवेल शाखेचे एलआयसीचे मुख्य कार्यालय येथे आहे. या तीन मजली इमारतीतून पनवेल भागाचा कारभार चालतो. पनवेल तालुक्यातील अनेक नागरिक, एलआयसी एजंट दररोज विविध कामांसाठी कार्यालयात येत असतात. एलआयसीचा हप्ता भरण्यासाठी हजारो नागरिक रांग लावून उभे असतात. अनेक वर्षांपासून धोकादायक असलेल्या या इमारतीला महापालिकेने 12 जून 2019 रोजी नोटीस पाठविली आहे. इमारत धोकादायक असल्यामुळे रिकामी करण्यात यावी, असे या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे, मात्र एलआयसीने भाडेतत्त्वावर घेतलेली ही इमारत रिकामी केली नसून धोकादायक इमारतीतच कारभार सुरू असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने पाठविलेल्या पत्राला एलआयसी प्रशासनाने कार्यालयाची जागा बदलण्यासाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती दिल्याचे प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी सांगितले, मात्र इमारत रिकामी करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.
पनवेलमध्ये 60 इमारती धोकादायक असून अनेक इमारतींतील घरे रिकामी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यापैकी अनेक रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या, मात्र एलआयसीने जागा रिकामी केली नसल्यामुळे येथे येणारे एलआयसी कर्मचारी, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
– एलआयसीचे कार्यालय भाडेतत्त्वावर असून संबंधित इमारतीच्या मालकाला इमारत रिकामी करण्याची सूचना महिनाभरापूर्वी दिली आहे. एलआयसी प्रशासन पर्यायी जागेच्या शोधात असल्याचे कारण सांगत आहे, मात्र त्यांनी तातडीने इमारत रिकामी करणे गरजेचे आहे.
-श्रीराम हजारे, प्रभाग अधिकारी