मुंबई : प्रतिनिधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणार्या ट्वेन्टी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड दौर्यानंतर विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीचे या सामन्यात कमबॅक झाले असून, दिनेश कार्तिकला वन डे संघातून डच्चू देण्यात आला आहे. भारतीय संघ आगामी वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेकडे पाहत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पहिल्या दोन वन डे आणि उर्वरित वन डे सामन्यांसाठी वेगळे संघ जाहीर केले आहेत; तर ट्वेन्टी- 20 मालिकेसाठी एकच संघ जाहीर करण्यात आला आहे. कोहलीचा ट्वेन्टी-20 व वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यासह जसप्रीत बुमराचाही 15 सदस्यीय संघांत समावेश करण्यात आला आहे. बुमरालाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेला टी-20 सामन्याने 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन सामने अनुक्रमे विशाखापट्टणम व बंगळुरु येथे होतील. पाच सामन्यांची वन डे मालिका 2 मार्चपासून सुरू होईल आणि पहिला सामना हैदराबाद येथे होईल. त्यानंतर नागपूर (5 मार्च), रांची (8 मार्च), मोहाली (10 मार्च) व दिल्ली (13 मार्च) असे सामने होतील.
— ट्वेन्टी -20 संघ : विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, विजय शंकर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, उमेश यादव, सिद्धार्थ कौल, मयांक मार्कंडे. वनडे संघ (पहिल्या दोन सामन्यांसाठी) : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, रिषभ पंत, सिद्धार्थ कौल, लोकेश राहुल.
–वनडे संघ (उर्वरित सामन्यांसाठी) : विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, विजय शंकर, पंत, राहुल.