मुरुड : प्रतिनिधी
तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर अतिक्रमण करून भाजी विक्रीसाठी काही शेड उभारण्यात आल्या होत्या. मात्र त्याविरोधात मुख्याध्यापकांनी उपोषणाचा इशारा देताच संबंधीतांनी या शेड तात्काळ हटवल्या आहेत.
मुरूड तालुक्यातील यशवंतनगर -नांदगाव येथे श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालय ही माध्यमिक शाळा आहे. या शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील मुंबईकडे जाणार्या रस्त्यावर अज्ञात इसमांनी रात्रीच्या अंधारात मातीचा भराव टाकून त्यावर लाकडी शेड उभारल्या होत्या. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तेथेच भाजी विक्रीसाठी उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेडमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या शेड हटवाव्यात अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा हायस्कूलचे मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांनी प्रशासनाला दिला होता.
दरम्यान, मुरुड पोलीस ठाण्याने या अनधिकृत शेड उभारणार्यांचा शोध घेतला. व त्यांची पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली. त्यात बिट हवालदार सचिन वाणी यांनी, हायस्कूलसमोर उभारण्यात आलेल्या शेडमुळे अपघाताची शक्यता वाढल्याचे सांगून, या शेड काढून घेण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत संबंधीतांनी आपल्या शेड काढून घेतल्या. मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांनी मुरुड पोलीस ठाणे व तहसील कार्यालयाचे आभार मानले.