रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची टीका
मुंबई : प्रतिनिधी
हात धुवुन मागे लागेल अशी जाहीर धमकी विरोधी पक्षांना देणे ही मुख्यमंत्र्यांची संविधानिक दृष्ट्या चूक आणि लोकशाहीला मारक भूमिका आहे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडी सरकारने वर्षभर केलेले कामाची आधारावर राज्य सरकारला किती गुणा द्यावेत याचा जनतेला प्रश्न केला तर जनता महाविकास आघाडी सरकारला नापास सरकार अशी संभावना करीत 100 पैकी 30 गुण देईल, असा टोला रामदास आठवले यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
कोरोनाच्या संकटात राज्य सरकारने निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई, विजबिल माफीवरून जनतेच्या डोळ्यांत राज्य सरकार ने केलेली धूळफेक आणि कंगना राणावत, अर्णब गोस्वामी प्रकरणी राज्य सरकारची दिसलेली सुडबुद्धि हे राज्य सरकारला शोभणारे नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धुवून विरोधकांच्या मागे लागणार अशी धमकी देणे हे संविधानिक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीला शोभणारे नाही. लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो. प्रश्न विचारणार्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे असते. हात धुवुन मागे लागायचे नसते. विरोधकांच्या मागे हात धुवून लागणार ही धमकी संविधानिक दृष्ट्या चूक, लोकशाहीला मारक भूमिका आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.