Breaking News

अलिबागच्या खारेपाटात भीषण पाणीटंचाई

आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील टँकरमुक्त तालुका अशी ओळख असलेल्या अलिबाग तालुक्यातील खारेपाट परिसरातील गावांना डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या भेडसावते आहे. अनेक गावात आठवड्यातून जेमतेम एक दिवस पाणीपुरवठा होत आहे.

मांडवा, बोडणी, मिळकतखार, रेवस, सारळ, वीर्तसारळ, डावली, रांजणखार दत्तपाडा, फुफादेवीचा पाडा, आवळीपाडा, कोप्रोली, कावाडे या गावांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. इथल्या महिलांना आठ – आठ दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. पाणी आले तर ते भरण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते आणि त्यातून वाद सुरू होतात. आता कुठे डिसेंबर महिना सुरु झाला आहे. या गावान नियमित पाणीपुरवठा झाला नाही तर भविष्यात पाण्यावरून होणारे वाद गंभीर स्वरूप धारण करू शकतात, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करताहेत.

अलिबागच्या खारेपाट भागातील विहिरींना खारेपाणी येते. ते पिण्यायोग्य नाही. शिवाय पिण्याच्या पाण्याचे पारंपारिक स्त्रोत खारट झालेले आहेत. त्यामुळे या गावांना केवळ नळपाणी योजनांवरच अवलंबून रहावे लागते. यासाठी रेवस प्रादेशिक पाणीपुरवठा योजना क्रमांक 1 व 2 अशा दोन योजना राबवण्यात आल्या. त्यातील रेवस योजना क्रमांक 1 वर 25 गावे आणि 10 वाड्या अवलंबून असून त्याद्वारे जवळपास 35 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जातो. 1980 मध्ये कार्यान्वीत झालेल्या या योजनेचे नूतनीकरण तीन वर्षांपूर्वी करण्यात आले आहे.

असं असलं तरी या योजनेवरील अनेक गावे कायमच तहानलेली राहिली आहेत. सोगाव येथील साठवण टाकीतून झिराडपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होत असतो. परंतु पुढे योजनेच्या टोकावरील गावांना पाणी मिळत नाही. मांडवा, बोडणी, मिळकतखार, रेवस, सारळ, वीर्तसारळ, डावली रांजणखार दत्तपाडा, फुफादेवीचा पाडा, आवळीपाडा, कोप्रोली, कावाडे या गावांना पाणी मिळत नाही.

ग्रामस्थांना किमान दरडोई दररोज 55 लीटर पाणी मिळावे, या हेतुने बोडणी इथे चार लाख लीटर क्षमतेची साठवण टाकी बांधण्यात आली आहे. परंतु या टाकीत पाणी पडतच नाही. दुसरे म्हणजे या योजनेवर अनेक ठिकाणी अनधिकृत नळकनेक्शन घेण्यात आले आहेत. परंतु ही योजना राबवणारा जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग त्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. यासंदर्भात ग्रामस्थांनी, संबंधित ग्रामपंचायतींनी वेळोवेळी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याकडे तक्रारी केल्या, पाठपुरावा केला, परंतु काहीच कार्यवाही झाली नाही. ही गंभीर समस्या वेळीच मार्गी लागली नाही तर ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. संबंधित यंत्रणेने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करताहेत.

ही गावे योजनेच्या शेवटच्या टोकावर आहेत. त्यांना पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे . जलवहिन्या जुन्या असल्याने त्या नवीन टाकणे गरजेचे आहे. त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे. ते काम झाले तर ही समस्या कायमची मार्गी लागेल.

-एकनाथ कुदळे, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, अलिबाग

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply