Breaking News

‘आलाना’विरोधात स्थानिकांचा पुन्हा एल्गार

नोकरीत सामावून घेण्यासाठी आजपासून साखळी उपोषण

खालापूर : प्रतिनिधी

स्थानिकांना रोजगार देण्याच्या मुद्यावरून साजगाव ग्रामस्थ आणि आलाना कंपनी सहा वर्षानंतर पुन्हा समोरासमोर आले असून, स्थानिकांना नोकरीत सामावून घ्यावे यासाठी साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी गुरुवार (दि. 3) पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

खालापूर तालुक्यातील सारसन येथे तेलाचे उत्पादन करणारा आलाना फ्रिगोरी फिको हा कारखाना आहे. या कारखान्याला स्थानिकांचे वावडे असून सहा वर्षापूर्वी उपोषण केल्यानंतर दहा स्थानिक तरुणांना कंपनीने नोकरीत सामावून घेतले होते. मात्र या कामगारांना कोणतेही काम न देता त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाने केल्याचा आरोप आहे. सहा वर्ष होवूनही या कामगारांना कायम करण्यात आलेले नाही. सहा वर्षापूर्वी 20 जणांना नोकरीत घ्यायचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. मात्र हे आश्वासन आजवर पाळण्यात आलेले नाही.

आता कंपनीचा नवीन प्लांट सुरू झाला असून, त्यात जास्तीत जास्त स्थानिकांना सामावून घ्यावे, सध्या काम करत असलेल्या कामगारांना कायम करून कंपनीत काम द्यावे, संपूर्ण प्रकल्पात स्थानिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशा स्थानिक ग्रामस्थांच्या मागण्या आहेत. त्यासाठी व्यवस्थापनाबरोबर अनेक बैठका झाल्या. मात्र सकारात्मक मार्ग न निघाल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

आलाना कंपनीला सर्व प्रकारचे सहकार्य करूनही कंपनी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यास टाळाटाळ करत असल्याने ग्रामस्थांनी गुरुवारपासून साखळी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.

-अजित जाधव, सरपंच, साजगाव, ता. खालापूर

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply