Breaking News

मतदानासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणाही सज्ज; रायगडात 22 लाख 73 हजार मतदार बजावणार हक्क

अलिबाग : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत आहे. रायगड  जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दोन हजार 714 मतदान केंद्रांवर जाऊन एकूण 22 लाख 73 हजार 239 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक शांततेत व सुरळीत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, अलिबाग, पेण, श्रीवर्धन व महाड असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. श्रीवर्धन व पेण विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वाधिक प्रत्येकी 14, अलिबागमध्ये 13, कर्जतमध्ये 11, पनवेल 10 आणि महाड व उरणमध्ये प्रत्येकी आठ असे एकूण 78 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

जिल्ह्यात 22 लाख 73 हजार 239 मतदारांची नोंद झाली आहे. त्यामध्ये 11 लाख 57 हजार 457 पुरुष मतदार, 11 लाख 15 हजार 777 महिला मतदार व इतर पाच यांचा समावेश आहे. जिल्ह्यात 16 हजार 901 दिव्यांग मतदार आहेत. मतदानासाठी दोन हजार 714 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली आहे.

निवडणुकीच्या कामासाठी 12 हजार 697 अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये सात हजार 433 पुरुष आणि पाच हजार 264 महिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक हजार 905 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. 41 भरारी पथकांची स्थापनाही केली आहे. 3013 मतदान युनिट आणि तेवढेच मतदान यंत्रे, 3450 व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध झाली आहेत.मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत व्हावी, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी  जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात तीन हजार 483 पोलिसांच्या ताफ्यासह केंद्रीय सुरक्षा बलाच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात 134 पोलीस अधिकारी, दोन हजार 103 कर्मचारी, एक हजार 246 होमगार्ड, तसेच केंद्रीय सुरक्षा बल विभागाच्या पाच तुकड्या अशी सुरक्षा व्यवस्था सज्ज आहे.

– पावसाचा इशारा

रायगड जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. 21 आणि 22 ऑक्टोबर रोजी हा पाऊस होण्याचा अंदाज आहे. ‘एएनआय’ने ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी कार्यकर्त्यांना दक्ष राहावे लागणार आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply