Breaking News

कोरोना काळातही बीसीटी विधी महाविद्यालयाचे उत्तम कार्य

पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतात कोविड 19 साथीच्या आजाराच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून लॉकडाऊन सुरू झाले आणि तेव्हापासून अजूनही महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीस मनाई आहे. मार्चपासून लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदिन लेक्चर्स बंद केली असतानासुध्दा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाने एकमेकांमध्ये अंतर पाळण्याचे उद्दिष्ट साधतानाच वर्क फ्रॉम होम संकल्पना प्रत्यक्षात आणली आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन लेक्चर्स सुरू करून त्या सत्राचा सर्व अभ्यासक्रम विहीत मुदतीत पूर्ण केला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे एप्रिल-मे महिन्यात होणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आणि जुलैअखेरीस शैक्षणिक वर्ष 2020-21ची सुरुवात झाली. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला आणि पुढील सत्रातील सर्व लेक्चर्स ऑनलाइन पद्धतीने घेऊन ज्ञानदानाचे कार्य आबाधित ठेवण्यात आले.

या कठीण काळातसुद्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता न्यायाधीश, कायदेतज्ज्ञ आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शीतला गावंड यांनी विविध वेबिनार (ऑनलाइन) आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला. लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिल 2020मध्ये विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन (पीपीटी) स्पर्धा आयोजित केली होती. 24 जुलैला कंझ्यूमर गाइडन्स सोसायटी ऑफ इंडियासोबत ‘लॉ अ‍ॅण्ड कंझ्यूमरीझम अ‍ॅण्ड फायनान्शियल लिटरसी इन कोविड-19 टाइम्स’ या विषयावर वेबिनार झाले.

त्यानंतर मुंबई विद्यापीठाचा विधी विभाग आणि भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2020-21 अंतर्गत ‘कायदा तुमच्या दारी’ या 28 जुलै ते 1 ऑगस्ट अशा सलग पाच दिवसांच्या वेबिनारमध्ये मुंबई विद्यापीठ, विधी शाखेच्या प्रमुख डॉ. राजेश्री वर्‍हाडी यांनी तसेच मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेतील सहाय्यक प्राध्यापक डॉ. संजय जाधव यांनी ‘आर्बिट्रेशन आणि मेडीएशन’ या विषयावर, जितेंद्र चौहान विधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. शर्मिला घुगे यांनी ‘आर्टीकल-21 कॉन्स्टीट्यूशन ऑफ इंडिया-ग्लिम्प्स अ‍ॅट लँडमार्क जजमेंट्स’ या विषयावर, अ‍ॅड. श्रीकांत गावंड, अतिरिक्त सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय यांनी ‘कन्फेशन ऑफ अ‍ॅक्युज्ड इन क्रिमिनल लॉ’ या विषयावर, अ‍ॅड. विरा गायकवाड, अति. सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय यांनी ‘ड्राफ्टींग ऑफ प्लिडींग अ‍ॅण्ड कॉन्व्हेयन्स’ या विषयावर, तर अ‍ॅड. निरंजन मुंदरगी, वकील, मुंबई उच्च न्यायालय यांनी ‘रिलेव्हन्सी ऑफ फॅक्टस’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेतील सहा. प्राध्यापक डॉ. संजय जाधव यांनी ‘कॉर्पोरेट लॉ जुरिसप्रुडन्स’ या विषयावर, तर 19 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठाच्या माजी डिन डॉ. रश्मी ओझा यांनी ‘इंटरनॅशनल ह्युमॅनीटेरियन प्रिन्सीपल्स अ‍ॅण्ड ह्युमन राइट्स’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

5 सप्टेंबर रोजी भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाच्या कै. जनार्दन भगत स्मरणीय तृतीय व्याख्यानमालेचे उद्घाटन कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते झाले आणि त्यांनी पहिले व्याख्यान ‘हेल्दी लिगल प्रोफेशनल फॉर हेल्दी सोसायटी’ या विषयावर दिले आणि त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजाबद्दल तसेच येथे विद्यार्थ्यांना चांगली सुसंधी उपलब्ध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या मालिकेतील दुसरे व्याख्यान मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी ‘सिनारीओ ऑफ करंट लीगल एज्युकेशन’ या विषयावर दिले. तिसरे व्याख्यान

सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी ‘एक्स्ट्राऑर्डिनरी ज्यूरिसडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट’ या विषयावर दिले आणि शेवटचे व्याख्यान मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ राम आपटे यांनी सेपरेशन ऑफ पॉवर इन इंडिया -कॉन्स्टीट्यूशनल प्रोव्हीजन अ‍ॅण्ड रियालीटी या विषयावर दिले. सर्व वक्त्यांनी प्रत्येक व्याख्यानाच्या शेवटी प्रश्नोत्तराच्या सदरात विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.

सप्टेंबरमध्ये मुंबई विद्यापीठाने सर्व शाखांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले, परंतु कमी वेळात सर्व शाखांच्या परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठाने शाखानिहाय व जिल्हानिहाय क्लस्टर तयार करून प्रत्येक क्लस्टरसाठी लिड महाविद्यालयाची निवड केली. रायगडात येणार्‍या सर्व विधी महाविद्यालयांकरिता भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाची लिड महाविद्यालय म्हणून निवड करण्यात आली आणि सर्व परीक्षांचे सुयोग्य नियोजन करून 25 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरळीत पार पडल्या. त्यानंतर कोरोना संक्रमण कमी होण्याची शक्यता नसल्याने उर्वरित वर्षाच्या परीक्षाही ऑनलाइन घेण्याचे मुंबई विद्यापीठाने निश्चित केले व निर्धारित वेळापत्रकानुसार 26 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत विधी शाखेच्या परीक्षा होतील. या परीक्षांसाठीही रायगड क्लस्टरकरिता लिड महाविद्यालयाची जबाबदारी याच महाविद्यालयास देण्यात आली.  

‘कायदा तुमच्या दारी’ या मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाने सुरू केलेल्या उपक्रमासाठी तसेच रायगड क्लस्टरसाठी लिड महाविद्यालय म्हणून मुंबई विद्यापीठाने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या बीसीटी विधी महाविद्यालयाची निवड केल्यामुळे केलेल्या चांगल्या कामाची पोचपावती मिळाल्याचे आम्हाला समाधान लाभले, अशी भावना प्राचार्य डॉ. शीतला गावंड यांनी व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संकटकाळातदेखील भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकरिता घेतलेल्या परिश्रमाचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply