Breaking News

मजुरांची परवड सुरूच

शहरांमध्ये जुलैपासून अनलॉक सुरू झाल्याने कुशल कामगारांची उणीव जाणवू लागली आहे. परंतु लॉकडाऊनमधील महिन्यांच्या तोट्याचा बोजा डोक्यावर असताना व पुन्हा लॉकडाऊन येऊन आदळेल की काय अशी भीतीही वाटत असताना, पदरमोड करून मजुरांना शहरात आणणे, त्यांना पूर्वीसारखाच रोजगार देणे कंत्राटदार वा मालकांनाही परवडणारे नाही. तरीही बांधकाम व्यावसायिक व कारखानदार अधिकार्‍यांना पाठवून कुशल कामगारांची समजूत काढून, प्रसंगी त्यांचा तिकिट खर्च उचलून त्यांना महानगरांमध्ये परत आणत आहेत असेही दिसते आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव सुरू होताच या जागतिक महामारीपासून देशाला वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च अखेरीस तातडीने कठोर लॉकडाऊन पुकारला. त्यानंतरचे कित्येक आठवडे आपण देशभरातल्या निरनिराळ्या महानगरांतून, शहरी भागांतून गावांकडे परतणार्‍या स्थलांतरित मजुरांच्या लोंढ्यांना बातम्यांमधून पाहात होतो. शहरात आपल्याला कुणीही वाली नाही याची विषण्ण करणारी जाणीव घेऊन हे स्थलांतरित मजूर आपापल्या गावी, प्रामु‘याने उत्तर भारतातील उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये परतले होते. पश्चिम बंगाल, हरयाणामध्येही बरेच मजूर परतले. एव्हाना देशभरात अनलॉक 3ची अंमलबजावणी कमी-अधिक प्रमाणात सुरू झाली असून गावी परतलेल्या मजुरांचे उलटे स्थलांतर सुरू झाल्याची चर्चा अधुनमधून होते आहे. अनलॉक 3च्या नव्या नियमावलीनुसार अनेक गोष्टी नव्याने खुल्या होऊ लागल्यामुळे हे मजूर, कष्टकरी मोठ्या प्रमाणात परततील असे कुणाला वाटत असेल तर तसे मात्र दिसत नाही. शहरांमधील कोरोनाच्या फैलावाच्या भीतीमुळे मजूर खरे तर परतण्यास फारसे उत्सुक नाहीत. जे काही मोजके मजूर परतले आहेत ते गावी रोजगाराची वानवा असल्यामुळेच. मार्चअखेरीस देशात लॉकडाऊन पुकारला गेल्यानंतर आपल्या घरी परतण्याच्या ओढीने निघालेले लोंढे एप्रिल अखेरपर्यंत ग‘ामीण जीवन-व्यवहारात स्थिरावले. त्यामुळेच एप्रिलमध्ये दिसून आलेली बेरोजगारी मे-जूनमध्ये दिसली नाही. गावी परतल्यावर एप्रिल-मेमध्ये या मजुरांना रबी हंगाम अखेरीची कामे मिळाली तर जूनमध्ये त्यांनी खरीपाच्या पेरण्यांमध्ये सहभाग घेतला. पण जुलैपासून मात्र पुन्हा कामासाठी ताटकळणे सुरू झाले. मनरेगासार‘या योजनेने अनेकांना काम मिळवून दिले असले तरी गावी परतलेल्यांची सं‘याच इतकी मोठी होती की सगळ्यांना काम मिळणे अशक्यच होते. त्यात शहरात चांगला रोजगार कमावणार्‍यांना मनरेगाची रोजगारी तुटपुंजी वाटणेही स्वाभाविकच. परंतु शहरांमध्ये कोरोनाची दहशत अद्यापही कायम असल्यामुळे परतण्याचे प्रमाण बरेच कमी असून मजुरांची टंचाई अनेक क्षेत्रांमध्ये जाणवते आहे. सर्वसामान्यांनाही याचा त्रास जाणवतो. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार यांसारखी कामे करणारे सहज उपलब्ध होत नाहीत. अनेक वस्तूंची दुरुस्ती करवून घेताना नाकीनऊ येत आहेत. सलून आदी सेवा सुरू झाल्या असल्या तरी त्यांचेही अनेक कर्मचारी गावांहून परतण्यास अद्याप उत्सुक नाहीत. कोरोनाचा फैलाव वर्षअखेरीपर्यंत असाच सुरू राहू शकतो, पुन्हा लाट येण्याची शक्यता आहे आदी गोष्टींची चिंता त्यांनाही सतावते आहे. सारेच लसीच्या बातम्यांकडे लक्ष ठेवून बसलेले. शहरांतील दाटीवाटीच्या वस्त्यांपेक्षा गावाकडील मोकळा निवास बरा अशा विचाराने अनेक जण नाईलाजाने तिकडेच थांबले आहेत. निव्वळ अनलॉक म्हणून सारे काही कसे सुरू होणार? सध्याच्या परिस्थितीत अगतिक मजूर वर्ग मात्र इकडे आड, तिकडे विहिर अशा कात्रीत सापडला आहे.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply