चिमुरडीवर बलात्कार करून हत्या
पेण : प्रतिनिधी
माणुसकीला कलंक लावणारा प्रकार सरत्या वर्षाअखेरीस पेणमध्ये घडला आहे. पेणजवळील आदिवासी वाडीतील तीन वर्षीय बालिकेवर एका नराधमाने बुधवारी (दि. 30) पहाटेच्या सुमारास पाशवी अत्याचार करून तिचा खून केला. या संतापजनक घटनेने पेण तालुक्यासह रायगड जिल्हा हादरला असून, अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
या प्रकरणी 34 वर्षीय नराधम आदेश मधुकर पाटील (रा. साबर सोसायटी, मुळ गाव गागोदे, ता. पेण) याला पोलिसांनी घरून अटक केली आहे. आरोपीने यापूर्वीही असे प्रकार केले असून, तो शिक्षा भोगून आलेला आहे. पेणच्या समस्त नागरिकांनी या घटनेचा निषेध केला असून, ही केस अतिजलद न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्टात) चालवून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले की, पेण शहरानजीक असलेल्या पांचोळा आदिवासीवाडीतील पीडित बालिकेचे कुटुंब रात्री आपल्या घरात झोपले होते. त्यांच्या घराला दरवाजा नसल्याचे पाहून नराधम आदेश पाटील याने तीन वर्षीय चिमुरडीला बुधवारी रात्रीच्या सुमारास घरातून उचलून नेले आणि तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. या प्रकरणी आरोपीवर अपहरण, बलात्कार, निर्घृण हत्या व पोक्सो, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला असून, यामध्ये 376 (i),(j), 363, 366, (A), 448, 302, 201, बाळ लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 अंतर्गत कलम 4, 6, 8, 12, सह अनुसूचित जाती, जमाती अत्याचार अधिनियम 1989 व सुधारणा अधिनियम 2015चे कलम 3(I), (w), (i), (ii), 3(2) (v) या कलमांचा समावेश आहे. अलिबागवरून तातडीने श्वानपथक, ठसे तज्ज्ञ पथकाला घटनास्थळी पाचारण करून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
दरम्यान, या घटनेचे वृत्त पसरताच विविध संघटना, आदिवासी समाजातील लोक, राजकीय कार्यकर्ते यांनी पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. या वेळी कायदा व सुव्यवस्था भंग होऊन नये यासाठी पोलिसांची कुमक रुग्णालय परिसर व पोलीस ठाणे परिसरात तैनात करण्यात आली होती. यामुळे पेणला छावणीचे स्वरूप आले होते.