पनवेल : वार्ताहर – आपण कुठेतरी कामात असताना अचानक फोन येतो आणि पलीकडून सांगितले जाते, “मी अमुक बँकेतून बोलत आहे, तुमचे एटीएम कार्ड एक्स्पायर्ड झाले आहे, ते ब्लॉक होऊ शकते. त्याला अपडेट करावे लागेल, व्हेरिफिकेशन करायचे आहे.” यावर विश्वास ठेवून विचारल्याप्रमाणे आपण नंबर सांगत बसलो तर थोड्या वेळातच मोबाइलवर तुमच्या खात्यातून एवढी रक्कम डेबिट झालेली आहे, असा मेसेज येतो. अशा प्रकारची ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रमाण शहरात वाढत आहे. व्यक्तिगत माहिती देऊ नका, असे आवाहन बँक, पोलीस खाते सातत्याने करीत असतानाही शहरात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्यानुसार शहरातील गंगाराम माळी (वय 51) यांना आरोपीने नोकरी डॉटकॉमवरून बोलत असल्याचे सांगून मोबाइलवर खोटी लिंक पाठविली. त्यात आयडीबीआय बँकेच्या तक्रारदारांना त्यांचा खाते क्रमांक तसेच डेबिट कार्डचे डिटेल्स भरण्यास सांगून त्याद्वारे त्यांच्या खात्यातून लबाडीने 88 हजार 552 रुपये रक्कम काढली. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रशासन कोळी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
पनवेलमधील ज्येष्ठ व्यक्ती रमेश गोकर्ण (82) यांना अज्ञात व्यक्तींनी फोन करून तो वोडाफोन कंपनीतून बोलत असल्याचे सांगून त्यांनी रमेश गोकर्ण यांचे सर्व बँकेचे कार्ड ब्लॉक झाले असल्याचे खोटे सांगून त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अकाऊंट नंबर तसेच इतर बँकांच्या अकाऊंट नंबरची माहिती काढून घेतली.
त्यानंतर त्याने पाठविलेला ओटीपी गोकर्ण यांच्याकडून जाणून घेऊन त्या खात्यामधून गोकर्ण यांच्या संमतीशिवाय जवळपास 83,659 रुपये ट्रान्सफर केले. याबाबत रमेश गोकर्ण यांची फसवणूक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
तसेच शहरातील नेहा गडा व रेणुका केसला या दोन महिलांना अज्ञात व्यक्तीने फोन करून गुगल पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून मोबाइल रिचार्जचे पैसे परत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्यांना व त्यांच्या मैत्रिणीला गुगल पे अकाऊंटवर अमाऊंट ऑप्शनमध्ये यूपीआय आयडीवर विशिष्ट कोड व रक्कम नमूद करण्यास सांगितला. त्या दोघींच्या बँक खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय 35,656 रुपये कोणत्या तरी अनोळखी खात्यावर ट्रान्सफर करून त्यांची ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
एखाद्या बँकेचा अधिकारी म्हणवून घेऊन अनोळखी नंबरवरून ग्राहकास फोन येतात. एटीएम बंद पडले असल्याची खोटी बतावणी केली जाते, तर काही वेळा ग्राहकांचे मनी वॉयलेटमधून ट्रान्सफरच्या केवायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे बँक खात्याची, ओटीपी, सीव्हीव्ही कोडची माहिती संकलित करून अलगदपणे पैसे काढून घेतात. फसवे बँक अधिकारी ग्राहकांबरोबर बोलत असतानाच त्यांना व्हॉट्सअॅपवर किंवा कोणत्याही ऑनलाइन मनी ट्रान्सफर अॅपवर एखादा क्युआर कोड पाठवून तो त्यांना स्कॅन करण्यास भाग पाडूनदेखील ऑनलाइन पद्धतीने पैसे लंपास केले जातात.
बँक, पोलीस खात्याकडून आवाहन
कोणालाही आपली व्यक्तिगत माहिती, बँक अकाऊंट नंबर देऊ नका. तसेच एसएमएसद्वारे आलेली कोणतीही लिंक खात्री केल्याशिवाय उघडू नका. जेणेकरून समोरच्या अज्ञात व्यक्तीकडून आपली होणारी आर्थिक फसवणूक आपण टाळू शकतो, असे आवाहन बँक आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.