Breaking News

आर्थिक आणि सामाजिक प्रदूषणापासून सावधान!

कोरोना संकटकाळातील अर्थकारण आणि समाजकारण अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय समाजाने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे, असे आता 10 महिन्यांच्या अनुभवानंतर अभिमानाने म्हणता येईल. या वेगळेपणाचे महत्त्व आपण सर्वसामान्य स्थितीतही जेवढे मान्य करू तेवढा भारतीय समाज आत्मविश्वासाने वाटचाल करू शकेल.

भारतीय शेअर बाजार दररोज नवे विक्रम प्रस्थापित करतो आहे. बाजारात येणार्‍या आयपीओंना भूतो ना भविष्यति असा प्रतिसाद मिळतो आहे, एवढेच नव्हे तर त्यांच्या लिस्टिंगचे लाभ तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. भारताकडील परकीय चलनाचा साठा आता विक्रमी 585 अब्ज डॉलर इतका झाला आहे. आपण राहतो तेथील बाजारावर नजर टाकली की मुबलक फळफळावळ आणि भाजीपाला तुलनेने स्वस्तात मिळतो आहे. कोरोनानंतर ज्या ऑटो आणि रियल इस्टेट क्षेत्राचे काय होणार, अशी चिंता लागली होती, ती दोन्हीही क्षेत्र वेगाने पुढे जात आहेत. कोरोनाचा तुलनेने कमी परिणाम झालेली शेती देशाच्या अर्थकारणाला सावरणारे क्षेत्र म्हणून पुढे आली आहे. पावसाने तात्कालिक हानी केली असली तरी त्याने देशाला गरज असलेली पाणी पातळी वाढविली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत तुलनेने लवकर सुधारणा दिसत असल्याने मोठ्या कंपन्यांचे लक्ष त्या भागातील वाढत्या विक्रीच्या आकड्यांकडे लागले आहे. जीएसटी या अप्रत्यक्ष कराचे संकलन प्रथमच 1.15 लाख कोटींवर गेले असून प्रत्यक्ष कर असलेल्या इन्कमटॅक्स भरणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनासाथ नावाच्या जगावरील अभूतपूर्व संकटानंतर भारताची आजची स्थिती ही अशी आहे.

ती अतिशयोक्ती नव्हतीच

अमेरिका आणि युरोपात अजूनही कोरोनामुळे व्यवहार बंद करण्याची वेळ येते आहे. तेथील नागरिकांमधील धास्ती अजून गेलेली नाही. व्यवहार बंद रहात असल्याने त्याचे त्या त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, याविषयी तेथे भीती व्यक्त केली जाते आहे. पण आपल्या देशात जणू कोरोनाच्या साथीवर आपण मात केली आहे, अशा पद्धतीने व्यवहार सुरू झाले आहेत. आणि मात केली, असे तरी त्यांना का वाटू नये? कारण 135 कोटी इतक्या प्रचंड लोकसंख्येच्या, दरडोई उत्पन्न कमी असलेल्या आणि दाटीवाटीने राहणार्‍या भारतीय समाजाने आकडेवारीने ते सिद्धच केले आहे. भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे, असे सुरुवातीला म्हटले जात होते, ती अनेकांना अतिशयोक्ती वाटत होती, पण आज तब्बल 10 महिन्यांनी तसे म्हणायला ठोस आधार मिळाला आहे. भारतीय जीवनशैली आणि राहणीमानाच्या चांगल्या बाजूंचा विचार केला पाहिजे, असे तर आज म्हणू शकतो. आता तर कोरोनावरील लसही आली आहे आणि तीही भारतातच तयार होते आहे. जगातील सर्वात मोठ्या लसीकरणाची सुरुवात काल भारतात झाली आहे.

भारतीय समाजाचे वेगळेपण सिद्ध

भारतीय समाज कसा बेशिस्त आहे, अस्वच्छ आहे, याची भरपूर चर्चा आपण करून झाली आहे. पण जगासमोरील अभूतपूर्व अशा संकटात आज जी स्थिती आहे, ती पाहता भारतीय समाजाचे वेगळेपण अगदी ठसठ्शीतपणे लक्षात आले आहे. अनेक विसंगती असलेल्या या समाजाचे सामुहिक वर्तन याकाळात अतिशय जबाबदारीचे राहिले आहे. समाजाला दिशा देणारी सरकारी व्यवस्था असेल, तीत काम करणारी प्रशासकीय, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा असेल, हिने तिच्या सर्व मर्यादांसह केलेल्या कामाचा वाटा, याआघाडीत निश्चितच आहे. याकाळात आजूबाजूला अनेक अनुचित घटना घडतच होत्या, पण समाजाचे मनोबल कमी होणार नाही, याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करणारी माणसेही याच समाजात होती. जग अशा संकटाचा अनुभव प्रथमच घेत होते, त्यामुळे त्या त्या वेळी घेतल्या गेलेल्या निर्णयाचे चांगले आणि वाईट, असे सर्वच परिणाम समाजावर झाले. पण तसे करणारा केवळ भारत हा एकटा देश नव्हता. सारे जगच संभ्रमात होते. या पार्श्वभूमीवर आज भारताच्या स्थितीकडे पाहिल्यास अर्थव्यवस्था आणि समाजातील आत्मविश्वास, या दोन्ही आघाडीवर आपण चांगल्या स्थितीत आहोत, हे महत्त्वाचे आहे.

अनुचित घटना ही ओळख नव्हे!

भारत नावाच्या एका खंडासारख्या असलेल्या या देशात सर्व अर्थांनी इतके वैविध्य आहे की त्याचे व्यवस्थापन करणे, ही मोठीच कसोटी आहे. देशात असलेली आर्थिक विषमता, जातीधर्मात निर्माण होणारी तात्कालिक तेढ, हाताला काम मागणारी वाढत चाललेली संख्या आणि त्यामुळे निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गरजा तसेच भाषा आणि सांस्कृतिक वेगळेपणाच्या अस्मिता.. हे सर्व 24 तास आणि 365 दिवस येथे अस्तित्वात असते. त्याचे रुपांतर त्या त्या वेळी अनेक अनुचित घटनांमध्ये होते, याचा अनुभव वर्षानुवर्षे आपण घेत आहोत. पण म्हणून त्या अनुचित घटना ही देशाची ओळख आहे, असे जर आपण मानू लागलो, तर भारतीयत्वाचा तो अपमान आहे. पण अनेकदा तेच होताना दिसते आहे. त्याचे कारणही समजून घेतले पाहिजे. जे भारतीय आहे, जे तुमचे मूळ आहे, ते चांगले नाही, असे ब्रिटिशांनी आपल्या समाजावर बिंबवले आणि आपण त्याला बळी पडलो. समाजात जे चांगले नाही, त्याचा त्याग करायचा असतो आणि ती एक मोठी प्रक्रिया असते, याचा आपल्याला विसर पडला. त्यामुळेच भारतीय समाजात सर्वच वाईट आहे, असे समजून त्याला आपण सतत झोडपण्याचा सोपा मार्ग निवडला आहे. कोणतीही सकारात्मक दिशा नसलेली माध्यमे (काही निवडक अपवाद वगळता) यात आघाडीवर असल्याने आणि माध्यमांमध्ये जे येते, तेच देशाचे वास्तव मानले जात असल्याने समाजात अशा प्रदूषणाची मोठी घुसखोरी पाहायला मिळत आहे. या प्रदूषणापासून दूर राहण्याचे शहाणपण भारतीय समाजातील सर्वसामान्य माणसांत असल्याचे कोरोना काळाने सिद्ध केले आहे.

कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित

कोरोना संकटानंतर जगात काय बदल होत आहेत, हा आज कुतूहलाचा विषय आहे. तंत्रज्ञानाच्या  वाढत्या वापराने प्रचंड गती घेतली आहे, हे आपण पाहतच आहोत. त्याचे बरेवाईट परिणाम पुढील काळात पाहण्यास मिळतील. कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व या संकटात अधोरेखित झाल्याने ती व्यवस्था अधिक मजबूत झाली, तर ते हवेच आहे. विशेषतः भारतासाठी ते खूप चांगले आहे, कारण कुटुंब व्यवस्था पाश्चात्य जगाने एक प्रकारे व्यवहार म्हणूनच स्वीकारली आहे. पण भारतात तिला आजही प्रचंड महत्त्व आहे. जन्माने जी नाती निर्माण होतात, त्याला भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्व आहे. त्याच्याशी माणसे जोडून राहिल्याने त्यांची मूळ पक्के असते आणि त्यावर जीवनाची इमारत उभी राहते. आयुष्याच्या त्या त्या टप्प्यात कोणी सक्रीय व्हायचे, कोणी कोणाला आधार द्यायचा आणि भौतिक विकास साधताना कोणत्या मर्यादा स्वत: मान्य करायच्या याचे काही आडाखे भारतीय कुटुंब व्यवस्थेत मान्य केले गेले आहेत. यातून समाजाची वीण किती पक्की बांधली जाते, याची प्रचितीच या काळाने दिली आहे. भारतीय समाज अशा अनेक चांगल्या पैलूंनी बांधला गेला, त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब सामाजिक शहाणपणात दिसते आणि त्याचा फायदा अर्थकारणाला मिळतो, असे निश्चितच म्हणता येईल. कोणी याला जुगाड म्हणत असेल तर त्याला या समाजाच्या पायाची खोली कळालीच नाही, असे म्हणावे लागेल.

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply