माणगाव ः प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद साहित्याचा मधुघट समूहातर्फे रविवारी (दि. 21) ऑनलाइन कविसंमेलनाचे सातवे पर्व अतिशय उत्साहात पार पडले. पाऊस या विषयावरील विविध कवी-कवयित्रींच्या कवितांनी रसिक अक्षरशः चिंब झाले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, कोमसाप केंद्रीय अध्यक्ष अशोक ठाकूर, कार्याध्यक्षा नमिता किर, रायगड भूषण एल. बी. पाटील व दक्षिण रायगड अध्यक्ष संजय गुंजाळ यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून पार पडलेल्या या ऑनलाइन कविसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध वैज्ञानिक तथा ज्येष्ठ कवी सतीश सोळांकुरकर यांनी कवितेसबंधी अनमोल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकात कवी हेमंत बारटक्के यांनी सर्वांचे स्वागत करून मागील संमेलनाचा थोडक्यात आढावा घेतला. या कविसंमेलनात तुषार जाधव-भुवन, सिद्धेश लखमदे-मुरूड, उल्का माडेकर-इंदापूर, मंदाकिनी हांडे-पनवेल, वैभव सूर्यवंशी-गोरेगाव, रेखा सोनावणे-पनवेल, श्रुती देसाई-राजे-अलिबाग, स्मिता पाबरेकर-माणगाव, संदीप जामकर-तळा, संध्या दिवकर-रोहा, माधवी थळकर-पनवेल यांनी पावसाच्या विविध छटा आपल्या प्रभावी सादरीकरणातून मांडून रसिकांना चिंब केले.
कविसंमेलनाचे बहारदार निवेदन कवी अजित शेडगे यांनी, तर आभार प्रदर्शन महाड कोमसाप सदस्या कवयित्री प्रिया शहा यांनी केले. समूहाचे मुख्य संयोजक गझलकार डॉ. रघुनाथ पोवार यांच्या उत्तम नियोजनातून कार्यक्रम यशस्वी झाला.