18 जानेवारीला मतमोजणी
अलिबाग, पनवेल ः प्रतिनिधी
राज्यातील जनतेचे लक्ष लागलेल्या 14 हजार गावांत ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (दि. 15) निवडणुका पार पडल्या. रायगड जिल्ह्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित 78 ग्रामपंचायतींच्या, तसेच पनवेल तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 22 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. भाजप पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ केंद्रांवर भेट देऊन उमेदवारांशी संवाद साधला. रायगडातील 78 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सुमारे 80 टक्के मतदान झाले.
612 जागांसाठी 1588 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून सोमवारी (दि. 18) सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पनवेल तालुक्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया शुक्रवारी झाली. त्या अंतर्गत भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह नेत्यांनी सुकापूर, केवाळे, हरिग्राम, वाजे, खानाव, पाले बुद्रुक, वलप, मोरबे, वाकडी या ठिकाणी भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, एकनाथ भोपी, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चा ग्रामीण अध्यक्ष आनंद ढवळे, सरचिटणीस विश्वजीत पाटील, रोहित घरत, राजा भोईर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
शुक्रवारी सकाळी 7.30 वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सुमारास मतदारांचा प्रतिसाद खूपच कमी होता. पहिल्या सत्रात कामानिमित्त गावाबाहेर जाणार्यांनी आपले मतदान करून घेतले, मात्र नंतर घरची कामे आटोपून महिलांनी मतदानासाठी गर्दी केली होती. शेतकरी शेतीची कामे आटोपून आले आणि त्यांनी मतदानासाठी रांगा लावल्या. दुपारी मतदानाचा वेग पुन्हा मंदावला. सकाळी 11.30 वाजेपर्यंत 35 टक्के, तर दुपारी दीड वाजेपर्यंत जवळपास 55 टक्के मतदान झाले. दीड वाजेपर्यंत 47 हजार 740 महिला व 49 हजार 381 पुरुष मिळून 97 हजार 121 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग मंदावला. तो पुन्हा चार वाजेनंतर किंचितसा वाढला. सायं. 5.30 वाजता मतदान प्रक्रिया थांबली. सुमारे 80 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारांना मतदानासाठी घराबाहेर काढण्यासाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते प्रयत्नांची शिकस्त करीत होते. ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असते. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांना हुडकून काढत होते. मतदान पूर्ण झाल्यानंतर किती मतदान झाले यावरून उमेदवारांनी आकडेमोडही सुरू केली असून विविध अंदाज व्यक्त होऊ लागले आहेत.
कोरोनाच्या नियमांचे पालन
मतदानादरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले. मास्क घालण्याबरोबरच थर्मल गनच्या साहाय्याने तापमान मोजून व ऑक्सिमीटर लावून तपासणी झाल्यानंतरच मतदाराला मतदान कक्षात प्रवेश दिला जात होता. सॅनिटायझरची व्यवस्थाही ठेवण्यात आली होती. या वेळी मतदान कक्षातील कर्मचार्यांना मास्कबरोबरच फेसशिल्डही पुरवण्यात आले होते.