Breaking News

शेअर बाजार म्हणजे लॉटरी नव्हे!

शेअर बाजारात अशक्य काही नसलं तरी अवाढव्य नफा थोड्याच अवधीत मिळणं हे लॉटरी लागण्यासारखंच असतं आणि म्हणून प्रत्येक वेळी अशी लॉटरी लागेल अशी आशा बाळगणं मूर्खपणाचं ठरू शकतं. जर आपली आर्थिक उद्दिष्टे अशा अवास्तव गृहितकांवर आधारित असतील, तर भविष्यात आपण नक्कीच अडचणीत येऊ शकतो.

कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी आपल्याकडं म्हण आहे आणि याची प्रचिती आपल्याला मागील आठवड्यात पाहायला मिळाली. मागील आठवड्याच्या लेखात केवळ टीव्ही वरील न्यूज चॅनेल्सवर ऐकून आपली गुंतवणूक करू नये या आशयाचा लेख लिहिल्यानंतर लगेचच म्हणजे गेल्या बुधवारी शेअरबाजारासाठी प्रसिद्ध अशा एका आघाडीच्या हिंदी न्यूज चॅनलवरील स्टॉक 2020 नावाच्या शो मधील यजमान हेमंत घई, त्याची पत्नी व त्याची आई यांना, भारतीय शेअर बाजारावर अंकुश ठेवणार्‍या सेबीनं शेअरबाजारातील त्यांच्या सर्व व्यवहारांवर बंदी घातली आहे. जया हेमंत घई (पत्नी) आणि श्याम मोहिनी घई (आई) यांनी हेमंत घई यांच्या टीव्ही शोचा गैरवापर केला. आज मोठ्या प्रमाणात खरेदी करून दुसर्‍या दिवशी (वरील भावात) विक्री करण्यासाठी (बीटीएसटी) त्यांनी टीव्ही शोचा वापर केला, हे सिद्ध झाले. कारण पत्नी आणि आईने घेतलेल्या शेअर्सची शिफारस हेमंत आपल्या शोमध्ये करत होता. जेणेकरून त्यांच्या शिफारशींवरून लोक खरेदी करतील आणि आपोआप त्याचा बाजारभाव वाढून घई कुटुंबीयांना ते शेअर्स वरील भावात विकता येतील. अशा प्रकारचे व्यवहार करून त्यामधून गैररीतीनं सुमारे तीन कोटी रुपये कमावल्याचं सेबीला आढळून आलेलं आहे. जानेवारी 2019 ते मे 2020 काळा दरम्यान असे व्यवहार झालेले आहेत. त्यामुळं अशा संधीसाधू फसव्या लोकांपासून दूर राहून स्वतःचा स्वतः योग्यप्रकारे अभ्यास करूनच स्वतःच्या गुंतवणुकीचे निर्णय स्वतः घ्यावेत.

त्याचप्रमाणं शेअरबाजाराच्या खास करून इंट्राडे ट्रेडिंगमधून अव्वाच्या सव्वा पैसे कसे कमवायचे याबद्दल आपण अनेक जाहिराती पाहतो. अशा क्लासेससाठी भरमसाठ शुल्कदेखील आकारलं जातं, अगदी वीस हजारांपासून ते दहा लाखांपर्यंत. शेअर बाजारात आपल्या भांडवलाच्या प्रमाणात परतावा ही तार्किक बाब वाटते, परंतु आपल्या भांडवलावर दरमहा 10-20 टक्के परतावा आणि दररोज पाच टक्के परताव्याच्या भूलथापांना बळी न पडणं हेच शेअरबाजारातील सूज्ञपणाचं पाहिलं लक्षण आहे. शेअरबाजाराबद्दलचं शिक्षण घेणं काही वावगं नाही, परंतु पैसे देऊन मूर्ख बनणं महागात पडू शकतं. शेअरबाजारात ट्रेडिंग करून जर रोजचे पाच टक्के कमावता येत असतील तर मोठमोठ्या उद्योगपतींनी आपले व्यवसाय सोडून अशा गोष्टींकडं आपलं लक्ष वळवलं असतं ही साधी बाब लक्षात घेतल्यास अशा भूलथापांना बळी पडण्यापासून आपण लांब राहू शकतो.

मागील लेखात आपण बाजारात सहज होणार्‍या चुका टाळण्याकरिता काही गोष्टी पाहिल्या होत्या त्यासंबंधीत अजून काही बाबी आपण पाहूयात.   

जोखीम व गुंतवणूक : शेअर बाजारातील गुंतवणूक ही अपारंपरिक गुंतवणूक प्रकारात मोडत असल्यानं जास्त जोखीम तिथं अधिक परतावा हे लक्षात ठेऊनच बाजारात गुंतवणूक करावी. नजीकच्या काळात लागणारे म्हणून हाताशी ठेवलेले पैसे कधीच शेअरबाजारात गुंतवू नयेत, कारण बाजारातील परतावा सुनिश्चित कधीच नसतो. त्यामुळं आपला घरखर्च व अत्यावश्यक खर्चांची तरतूद करूनच आपल्याला पुढील कमीतकमी पाच वर्षे न लागणारा पैसाच शेअरबाजारात गुंतवावा. त्याचप्रमाणं शेअरबाजारात आपण किती थेट नुकसान (booked loss) सोसू शकतो याची मर्यादा आखूनच शेअरबाजारात ट्रेडिंगसाठी उतरावं हे मी याआधीदेखील अनेकवेळां अनेक उदाहरणांद्वारे सांगितलेलं आहेच.

शिस्तबद्धता : अनेक वेळा बाजारात झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी असेल नसेल तेवढा आणि कधीतरी उसनवार करून बाजारात गुंतवणूक केली जाते. ही सर्वांत मोठी चूक आहे. त्याचप्रमाणं अधिक परताव्यासाठी ट्रेडींगकडं पाहिलं जातं, ज्यात वावगं काहीच नाही, परंतु भविष्यातील उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीनं योजिलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी केवळ 10 टक्केच पैसे हा अशा ट्रेडिंगसाठी भांडवल म्हणून वापरावा. यश मिळाल्यास पहिल्यांदा संपूर्ण भांडवल परत मिळवावं आणि मग ते वाढवत ठेवावं. मात्र नुकसानीत कोठे थांबायचं याचीदेखील आखणी आगाऊ केलेली असावी.

 संभ्रम : कोणत्याही वेळेस सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बाजारात वाट पाहणं. याचे दोन्ही अर्थ निघतात, दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यानंतर आपल्या योग्य निर्णयांवर ठाम राहणं आणि संपत्ती निर्मितीसाठी थांबणं, वाट पाहणं ज्याला आपण संयम असं संबोधू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाजारामध्ये घसरण झाल्यानंतर गुंतवणूक करण्यासाठी थांबणं. परंतु अशाप्रकारे अचूक वेळ कधीच (time the market) साधता येत नाही आणि म्हणूनच ठराविक अवधीमध्ये नियमीतपणे थोडी थोडी गुंतवणूक करणं हितावह ठरू शकतं. अगदी बाजारातील मोठमोठे नावाजलेले गुंतवणूकदारदेखील याबाबतीत जोखीम पत्करत नाहीत. सध्याच्या तेजीमध्ये अनेक  लोकांनी आपला पैसा गुंतवणूक न करता मोठ्या पडझडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सांभाळून ठेवलेला दिसून येईल, परंतु अशानं बाजारामधील संधीचा लाभ त्यांना उठवता आलेला नाही, यालाच आपण opportunity loss म्हणू शकतो.

आपल्या भावनांवर ताबा : विशेषत: भीती आणि लोभ यामुळे बरेच गुंतवणूकदार शेअर बाजारात पैसे गमावताना दिसतात. तेजीच्या प्रवाहात झटपट संपत्तीच्या नादात बाजारातील अनेक आमिषांना प्रतिकार करणं कठीण असतं. अनेक व्हिडीओद्वारे जेव्हा गुंतवणूकदारांकडून अल्पावधीतच स्टॉक मार्केटमध्ये कमालीची परतावा मिळण्याची कथा ऐकायला मिळते तेव्हा भल्याभल्यांचा लोभ वाढतो आणि अज्ञात कंपन्यांचे शेअर्स खरेदी करणे किंवा भविष्यातील धोका लक्षात न घेता ज्या प्रकारची समज नाहीये अशा फ्युचर्स व ऑप्शन्समध्ये व्यवहार करून आपलं भांडवल गमावण्याचा धोका उद्भवू शकतो. व्हिडीओ बनवणारे बव्हंशी लोक हे त्यामागं आपला व्यवसाय जोपासत असतात आणि नवखे लोक अतर्क्य परताव्याच्या अपेक्षेनं कष्टाचा पैसा अशाप्रकारे उधळून टाकताना दिसतात. शेअर बाजारात अशक्य काही नसलं तरी अवाढव्य नफा थोड्याच अवधीत मिळणं हे लॉटरी लागण्यासारखंच असतं आणि म्हणून प्रत्येक वेळी अशी लॉटरी लागेल अशी आशा बाळगणं मूर्खपणाचं ठरू शकतं. आणि जर आपली आर्थिक उद्दिष्टे अशा अवास्तव गृहितकांवर आधारित असतील तर भविष्यात आपण नक्कीच अडचणीत येऊ शकतो.

विविधता : कमीत कमी जोखीम असलेल्या गुंतवणूकींवर इष्टतम परतावा मिळविण्यासाठी विविध मालमत्ता प्रकार आणि गुंतवणूक साधनांद्वारे पोर्टफोलिओचे विविधीकरण करणं हे दीर्घावधीतील परताव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. विविधीकरणाचे स्तर प्रत्येक गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात.

अशा प्रकारे या गोष्टी कटाक्षानं पाळल्यास बाजारातील गुंतवणुकीच्या परताव्यास चार चाँद न लागल्यासच नवल.

सुपर शेअर : टाटा मोटर्स

मागील आठवड्यात टाटा मोटर्स या कंपनीचा शेअर 31 टक्क्यांनी वाढून या आठवड्याचा सुपर शेअर ठरला. जहांगीर रतनजी दादाभाई (जेआरडी) टाटा यांनी 1945 साली स्थापन केलेली टेल्को म्हणजे सध्याची टाटामोटर्स ही अनेकांच्या जिव्हाळ्याची व सर्वांच्याच परिचयाची कंपनी आहे. मागील काही दिवस प्रसारमाध्यमातून अशा वावड्या उठत होत्या की, भारतीय बाजारपेठेत दाखल होण्यासाठी प्रतीक्षेत असलेली नवनिर्वाचित जगातील सर्वांत श्रीमंत अशा एलॉन मस्क यांची अमेरिकन टेस्ला ही कंपनी भागीदारीसाठी अथवा तत्सम योजनेसाठी भारतातील टाटा मोटर्सची निवड करू शकेल. टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक व्हेइकल-विंग (टाटामोटरईव्ही) च्या अधिकृत ट्विटर हँडलने टेस्लाचं भारतात स्वागत अशा आशयाच्या ट्विटमुळं ही अफवा आणखी तीव्र झाली. हे ट्विटनंतर खाली घेण्यात आले. त्याचबरोबरीनं कंपनीची सहाय्यक कंपनी जॅग्वार लँड रोव्हरनं (जेएलआर) आपल्या विक्रीत पुन्हा सलग दुसर्‍या तिमाहीत मागील तिमाहीपेक्षा सरस विक्री नोंदवल्यानंदेखील हा शेअर मागील काही दिवस चर्चेत होताच. दैनिक आलेखावर सध्याचा बाजारभाव नव्यानं उडी घेण्यासाठी नक्कीच वाटत नाहीये. परंतु भविष्यात टेस्लाच्या हातात हात आल्यास आताचा बाजारभाव आताशी तेजीची सुरुवात वाटू शकतो. त्यामुळं पडझडीत 188 रुपयांच्या आसपास पुनर्खरेदीसाठी यावर लक्ष ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. (शुक्रवारचा भाव – 260 रुपये)

– प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply