‘रिलायन्स’विरोधात प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच
नागोठणे : प्रतिनिधी
येथील रिलायन्स कंपनीविरोधात आंदोलनास बसणार्या आंदोलनकर्त्यांचे अर्धशतक पूर्ण झाले असून, शनिवारी (दि. 16) 51वा दिवस होता. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने पहिल्या फेरीत 221 प्रकल्पग्रस्तांची यादी रोह्याच्या प्रांताधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वी देण्यात आल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी दिली.
प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी तातडीने दखल घेत या नावांची छाननी करण्यासाठी सदर यादी पेण प्रांताधिकारी तसेच रिलायन्स व्यवस्थापन आणि आमच्या समितीला देण्यात यावी असे कळविण्यात आल्याचे मिणमिणे यांनी या वेळी सांगितले.
संबंधित नावांची यादी कायम झाली तरी रिलायन्स व्यवस्थापन उर्वरित प्रकल्पग्रस्तांना घेण्याबाबत संघटनेला जोपर्यंत अधिकृत पत्र देत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
आमच्या आंदोलन समितीच्या मागणीनुसार रिलायन्स कंपनी उर्वरित सर्वच प्रकल्पग्रस्तांना काही काळात नोकरी देईलच, असा विश्वास संघटनेचे सरचिटणीस गंगाराम मिणमिणे यांनी व्यक्त केला.