पेण : प्रतिनिधी
मकरसंक्रांतीच्या दिवशी गुरुवारी पेणमध्ये नगरपालिका मैदानावर महिला पतंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिला अत्याचारविरोधी मंच व अंकुर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गेली नऊ वर्षे साजरा करण्यात येतो. शालेय विद्यार्थी या पतंगोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या पतंगोत्सवाची माहिती व जनजागृती करण्यासाठी गुरुवारी दुपारी महात्मा गांधी वाचनालयापासून पेण शहरात विद्यार्थिनींनी मिरवणूक काढली होती. सायंकाळी पेण नगरपालिकेच्या मैदानावर या मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. युनोमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या ङॠइढ कम्युनिटीच्या डॅनियल ताई यांनी प्रारंभी पतंग उडवून महोत्सवाचा शुभारंभ केला. त्यानंतर पतंग उडविण्यासाठी उपस्थित महिला, विद्यार्थिनींची एकच लगबग सुरू झाली.
महिला अत्याचारविरोधी मंचच्या अध्यक्ष वैशाली पाटील, कविता पाटील, ज्योती राजे, नीता कदम, वैशाली कांबळे, स्वाती मोहिते, मधुबाला निकम, शैला धामणकर, राजश्री पोटफोडे, प्रकाश पाटील, सुवर्णा पाटील, गणेश वाघमारे यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहयोगीता टेमघरे यांनी, तर नीता कदम यांनी आभार मानले.