Breaking News

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे तो सत्ताधारी शिवसेना पक्ष सूडबुद्धीने काम करीत आहे. हे राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी या पुढे आलेल्या मागणीला माझा पाठिंबा असून त्यासाठी आपण केंद्रात प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

निवृत्त नौदल अधिकारी यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा केंद्र सरकारकडून मिळवून देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे आपण प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्या कांदिवली पूर्वेतील ठाकूर कॉम्प्लेक्स मधील निवासस्थानी रामदास आठवले यांनी भेट देऊन शर्मा यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या वर प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव  लहाने यांच्या कडून उपचार करून घेण्याचा सल्ला ना. रामदास आठवले यांनी दिला. शर्मा यांच्यावर झालेला हल्ला हा जीवघेणा हल्ला होता. त्या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्याने कलम 307 ; 326 प्रमाणे गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र तशी कारवाई न केल्यामुळे हल्लेखोरांना त्वरित जामीन मिळाला आहे. याबाबत ना. आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच या हल्ल्यात पोलिसांनी योग्य गुन्हा दाखल करून योग्य तपास करावा या मागणीसाठी तसेच कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही हा ईशारा देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देऊन आज दि. 14 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता समता नगर पोलीस ठाणे येथे अप्पर पोलीस आयुक्त कार्यालयावर निदर्शने आयोजित केली असल्याचे रिपाइंचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष हरिहर यादव, रिपाइं  युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड, चंद्रकांत पाटील आदींनी जाहीर केले. या वेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष चंद्रशेखर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply