Breaking News

रिलायन्स गॅस प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक

कर्जतमधील पाइपलाइन उखडून टाकणार; प्रजासत्ताकदिनी उद्रेक आंदोलन

कर्जत : बातमीदार

रिलायन्स कंपनीकडून दहेज (गुजरात) ते नागोठणे अशी अशुद्ध गॅस वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ही पाइपलाइन टाकल्यानंतर कर्जत तालुक्यातील दहा गावातील शेतकर्‍यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. मोबदला मिळावा, यासाठी केलेल्या उपोषण, धरणे आंदोलनाला यश मिळत नसल्याने बाधीत शेतकर्‍यांनी आता ‘आर या पार‘ ची लढाई सुरू केली आहे. हे प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रजासत्ताक दिनी (दि. 26) गॅस पाइपलाइन उखडून टाकण्याचे उद्रेक आंदोलन करणार आहेत.

कर्जत तालुक्यातून रिलायन्सची गॅस पाइपलाइन गेली असून तालुक्यातील अवसरे, बिरदोले, कोदिवले, वंजारपाडा, पिंपळोली, तळवडे, वाकस, नसरापूर, गणेगाव आणि चिंचवली येथील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना त्याचा मोबदला दिला नाही. त्यातील 49 शेतकर्‍यांनी गेले वर्षभर विविध आंदोलने केल्यानंतर काही शेतकर्‍यांना मोबदला म्हणून धनादेश दिले आहेत, पण ते वटले नाहीत. तर काही शेतकर्‍यांना एकदाही मोबदला दिला नाही मात्र त्यांचे पैसे शासनाने दिले आहेत, असे दिसून येत असल्याने शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. काही शेतकर्‍यांच्या जमिनीचे पंचनामे हे बोगस शेतकर्‍यांना समोर उभे करून करण्यात आले आहेत, अशी तक्रार प्रजासत्ताक दिनी होणार्‍या आंदोलनाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत प्रकल्पग्रस्त शेतकरी केशव तरे, रोहिदास राणे आणि रमेश कालेकर यांनी केली. रिलायन्स गॅस पाइपलाइन प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी कर्जत येथील कमल सेवा केंद्रात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

यापूर्वी या शेतकर्‍यांनी धरणे आंदोलन, साखळी उपोषणे, आमरण उपोषणे केली असून, त्यावेळी  शासनाच्या प्रतिनिधींनी न्याय मिळवून देण्याची आश्वासने दिली होती. त्यात शासनाचे सक्षम अधिकारी पांडुरंग मकदुम यांनी रिलायन्स गॅस पाइपलाइन कंपनीला कर्जत तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला द्यावा, असे लेखी पत्र दिले होते. मात्र कंपनीने मोबदला दिला नाही. त्यामुळे आता प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी आर या पार ची लढाई सुरू केली असून प्रजासत्ताक दिनी बिरडोळे (ता. कर्जत) येथे पाइपलाइन उखडून टाकण्याचे उद्रेक आंदोलन केले जाणार आहे. या उद्रेक आंदोलनाला तालुक्यातील राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी केले आहे. दरम्यान, आंदोलनाच्या दिवशी पोलिसी बळाचा वापर झाला तरी मागे हटणार नाही, असा निर्धार सात गावातील 49 शेतकर्‍यांनी केला आहे.

भाजपचा सक्रिय पाठिंबा…

प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष असून या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे उद्रेक आंदोलनात सहभागी होणार आहेत. शेतकर्‍यांच्या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, तालुका सरचिटणीस राजेश भगत हे उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply