मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बैठकीत माहिती
नवी मुंबई : प्रतिनिधी
अवेळी पडणारा पाऊस, वादळवारा, वातावरणातील बदल, यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात आला असल्याने त्याचा अभ्यास करून मच्छीमारांना भरपाई देण्याबरोबर परिणामांची तीव्रता कमी करण्याबरोबर याबाबतीत ध्येय धोरण ठरविण्यासाठी अभ्यास गट समिती स्थापन करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत दिले. यामुळे कोकण किनारपट्टी परिसरात मासेमारी व्यवसाय करत असणार्या लाखो मच्छीमारांना याचा फायदा होणार आहे.
कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी मागील वर्षी झालेल्या विधी मंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या ताराकिंत प्रश्नांमध्ये वातावरण बदलामुळे पारंपारिक मासेमारी आणि मासळी सुकविण्याच्या व्यवसायात कोळी समाजाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांना भरपाई आणि उपाययोजना आखली जावी म्हणून अभ्यास गट समिती गठीत करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने झालेल्या बैठकीत कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके भाजपचे महाराष्ट्र मच्छीमार सेलचे अध्यक्ष अॅड. चेतन पाटील उपस्थित होते.
या वेळी पावसाळ्यात मासेमारी बंदी काळात खावटी देण्याबरोबरच मासेमारी व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे निश्चित पाठपुरावा करण्याचे निर्देश ही त्यांनी दिले. वेसावा आणि सातपाटी खाडीचा गाळ काढण्याची गरज लक्षात घेता 247 कोटींचा निधी वितरित करण्याचे निर्देश ही त्यांनी या वेळी दिले. त्याबरोबर चित्रा खलिजा तेलवाहु नौकांची झालेल्या टक्करीमुळे मासे विक्री करणार्या महिलांचा निधी निर्देशा अभावी कोर्टात प्रलंबित असल्याने तज्ञ वकिला मार्फत कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले.