पनवेल मनपा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण
पनवेल ः रामप्रहर वृत्त
टीआयपीएल प्रस्तुत सोसायटी क्रिकेट क्लब आणि सुनील सरगर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने तसेच भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी मैदानात ज्युनियर्स पनवेल प्रीमियर लीग 2023 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रॉयल्स संघाने विजेतेपद पटकाविले.
ज्युनियर्स पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा 16 वर्षाखालील मुलांसाठी 23 मे ते 2 जूनपर्यंत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाला. स्पर्धेत फ्युचर स्टार्स संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक रॉयल्स व द्वितीय एफएससीसी, गोल्ड ट्रॉफीमध्ये प्रथम क्रमांक न्यू पनवेल वॉरियर्स व द्वितीय रॉक विवा फायटर्स, तर सिल्व्हर ट्रॉफीमध्ये प्रथम क्रमांक प्रतीक अकॅडमी व द्वितीय मॉर्निंग पंटर्स या संघाने प्राप्त केला. सर्व विजेत्या संघांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.
पारितोषिक वितरण समारंभास उल्हास झुंझारराव, अॅड. सागर वाणी, प्रीतम कैया, सुहास हिरवे, राज खरोल, आयोजक सुमित झुंजारराव, अमेय देशमुख, सुनील सरगर, रवी सोळंकी, रिनेश जैन यांच्यासह इतर पदाधिकारी आणि खेळाडू उपस्थित होते.