Breaking News

नातं एकांकिका अटल करंडकाची मानकरी

राज्यस्तरीय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) स्वायत्त महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेत ठाण्याच्या व्हाइट लाइट संस्थेच्या नातं या एकांकिकेने बाजी मारत एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पटकाविला. पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी
(दि. 31) पारितोषिक वितरण सोहळा झाला.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि 99व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, तर सन्माननीय अतिथी म्हणून भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते व नाट्य परिषद पनवेल शाखा उपाध्यक्ष परेश ठाकूर, सिने अभिनेते संजय नार्वेकर, लेखक-दिग्दर्शक व अभिनेता अद्वैत दादरकर, अभिनेत्री ऋजुता देशमुख, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, अभिनेते व परीक्षक भरत सालवे, राहुल वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी प्रेमानंद गज्वी यांनी मार्गदर्शन करताना कलावंताला कोणीही हे सांगता कामा नये की तू हे कर, ते कर, हे करू नकोस. कलेने आपले सत्त्व जपले पाहिजे ही पहिली जबाबदारी लेखकांची आहे. भारत सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनायला हवे असेल तर शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडवणे गरजेचे असून, त्यासाठी कलावंतांनी मार्गदर्शन करायला हवे. आयुष्यभर कला कशी जपावी, आपला अभिनय कसा विकसित करावा हे श्रीराम लागू आणि निळू फुले यांनी शिकवले. शब्दांचे सामर्थ्य ’सामना’मधील त्यांच्या जुगलबंदीत पाहायला मिळते. तुम्ही एक एक प्रश्न घेतलात तरी खूप वेगळ्या प्रकारचे लेखन तुमच्याकडून होऊ शकते, असे सांगून त्यांनी या स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल आयोजकांचे भरभरून कौतुक करीत पोचपावती दिली.
भाजप सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांनी अटल करंडक स्पर्धेच्या संयोजकांमुळे आपल्याला या 75 एकांकिकांतून सकारात्मक ऊर्जा मिळाली. स्पर्धेतून थांबलेली क्रिएटिव्हिटी पाहायला मिळाली, पण अनेक एकांकिकांमधून नकारात्मकता दिसून येत असल्याची खंत व्यक्त करून त्यांनी आपल्या देशात नकारात्मकता नाही. त्यामुळे सकारात्मकता आपल्या स्क्रिप्टमध्ये असावी, असे सांगत भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयींची एक कविता वाचून दाखवली.
या सोहळ्यास भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्‍हाटे, मनपा महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशिला घरत, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, नगरसेविका रुचिता लोंढे, भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वर्षा नाईक, रवींद्र भगत, स्पर्धा सचिव व नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, स्मिता गांधी, अमोल खेर, चिन्मय समेळ, गणेश जगताप, पत्रकार स्वाती नाईक आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत नातं एकांकिकेने विजेता होण्याचा मान पटकाविला, तर आयोजकांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी प्रत्येक स्पर्धक कलाकार त्यांची टीम, प्रेक्षक आणि रंगकर्मी यांची काळजी घेत आपुलकीचं ’नातं’ अधिक घट्ट केल्याची प्रतिक्रिया या वेळी व्यक्त होत होती.  
ध्येय सोडू नका : लोकनेते रामशेठ ठाकूर
आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये या स्पर्धेत भाग घेऊन तुम्ही आम्हाला आनंद दिलात. कला प्रत्येकाच्या अंगात असते. तिला चालना द्यावी लागते. संधी मिळावी लागते. राजकारणात जाताना नुसती कला असून चालत नाही, पण चांगल्या कलाकाराला राजकारणात संधी मिळते. राजकारण वाईट नाही. त्यामुळे राजकारणात जायला घाबरू नका. समाजाच्या दृष्टीने आपली कला देणे हे जास्त महत्त्वाचे आहे व ती देत असताना आपले ध्येय सोडू नका.
 
एकांकिका करताना मला जास्त मजा यायची. अजूनही येते, पण एक क्षण असा आला की रूपारेल कॉलेजची ’वेगी वेगी धावू’ दिग्दर्शित करीत होतो. या एकांकिकेला मिळालेले बक्षीस पाहून मला समजले की एकांकिका स्पर्धेत बक्षीस मिळवण्याचा फॉर्म्युला आणि गणित मला कळले आहे. तेव्हा मी एकांकिका स्पर्धा करणे थांबविले. आपण स्पर्धा करणे कधी थांबविले पाहिजे आणि ती का करतो हे समजले पाहिजे. या स्पर्धेचे उत्तम नियोजन एक चांगली शिकवण देत आहे. त्यामुळे या आयोजनाबद्दल ठाकूरसाहेबांना देऊ तेवढे धन्यवाद कमीच आहेत.
-संजय नार्वेकर, अभिनेता

प्रत्येक कलाकाराने विद्यार्थीदशेत असावे. मी अजूनही विद्यार्थीदशेत आहे व यातच मला आनंद आहे. जोपर्यंत तुम्ही विद्यार्थीदशेत आहात तोपर्यंत तुमच्यातील कलाकार जिवंत राहील. तो जिवंत ठेवण्याचा मी प्रयत्न करते. मध्ये मी अद्याप आले नाही, पण यायची इच्छा आहे.
-ऋजुता देशमुख, अभिनेत्री  

आपला मराठी प्रेक्षक फार कमाल आहे. चांगली कलाकृती असेल तर पाहायला तो गर्दी करतो. ही स्पर्धा आमच्यासाठी एक चांगला अनुभव आहे. या स्पर्धेतून नियोजन कसे असावे याची जाणीवच नाही, तर प्रेरणाही मिळाली आहे.
-अद्वैत दादरकर, अभिनेता

खूप सुंदर आयोजन. सगळ्या गोष्टींची काळजी घेतली होती. सगळे वेळेत होते. घाई-गडबड नव्हती. थेटरला लागणारे साहित्य आम्हाला आयोजकांनी पुरवले होते. कोविडनंतर प्रयोग करणे तर खूप कठीण होते, परंतु इथे आयोजकांनी सुंदर, अप्रतिम आयोजन केल्याने सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या. जर दुसरीकडे स्पर्धा असती आणि अशा प्रकारे आयोजन नसते. मग आम्ही सांगू शकत नाही की प्रयोग करू शकलो असतो. आम्ही काहीसुद्धा आणले नव्हते. सगळ्या गोष्टी आम्ही इथल्या घेतल्या आणि प्रयोग करून आता बक्षीससुद्धा घेऊन चाललो.
-प्रसाद खोडवे, प्रथम पारितोषिक विजेते, ठाणे

आयोजन खूप मस्त. खूप छान अनुभव आहे. नियोजन नेटके होते. आमचे हे अटल करंडक स्पर्धेसाठी येण्याचे दुसरे वर्ष आहे. याच्या आधी गेल्या वर्षी आम्ही बिर्‍हाड एकांकिका केली होती.
-शेखर कदम, द्वितीय पारितोषिक विजेते, रत्नागिरी

 
सविस्तर निकाल
एकांकिका : प्रथम क्रमांक-नातं (व्हाइट लाइट, ठाणे) एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-बारस (कलांश थिएटर, रत्नागिरी) 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-कुणीतरी पहिलं हवं (बीएमसीसी, पुणे) 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-घरोटं (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई) 10 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-स्टार (जिराफ थिएटर, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : प्रथम क्रमांक-योगेश सप्रे, हिमांशू बोरकर (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-अभिजीत मोहिते (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-प्रसाद थोरवे (नातं-व्हाइट लाइट, ठाणे) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-गौरव म्हालदार (घरोट-नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-बॉबी (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; अभिनेता : प्रथम क्रमांक-प्रसाद थोरवे (नातं-व्हाइट लाइट, ठाणे) दोन हजार रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-महेश कापरेकर (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी) 1500 रुपये प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-अनिल आव्हाड (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-मंदार नेने (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-स्तिमित साने (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; अभिनेत्री : प्रथम क्रमांक-गायत्री नाईक (घरोटं-नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-स्नेहा चव्हाण (क्लिक-ओम साई कलामंच, वसई) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय-अक्षता टाळे (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-मुग्धा दातार (आर ओके-सीकेटी कॉलेज, पनवेल) 500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-आरती बिराजदार (बिनविरोध-रंगपंढरी, पुणे) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; संगीत : प्रथम क्रमांक-श्रीनाथ म्हात्रे (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-ऐश्वर्या वटवाल (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-क्षितिज भट, योगेश सप्रे, तन्मय भागवत (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक-शुभम ढेकळे, गौतम बहुतले (वण्डरिंग बोट-एमडी कॉलेज, मुंबई) पाचशे रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-ओंकार सप्रे (क्लिक-ओम साई कलामंच, वसई) प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; प्रकाशयोजना : प्रथम-श्रीश रत्नपारखी, निनाद जोगळेकर (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) दोन हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक-श्याम चव्हाण (वण्डरिंग बोट-एमडी कॉलेज, मुंबई) 1500 रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक-लकडबगधा (दवेरथ थिएटर, डोंबिवली) एक हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ-साई शिर्सेकर (स्टार-जिराफ थिएटर, मुंबई), प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह; विशेष पारितोषिके : लक्षवेधी दिग्दर्शन-यश पवार (वण्डरिंग बोट-एमडी कॉलेज, मुंबई), अजय पाटील, मनीष साठे (आरपार-फोर्थ वॉल, ठाणे), लक्षवेधी अभिनेता-अजय पाटील आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), स्वप्नील अंबायत (12 किमी-एएसएम प्रोडक्शन, मुंबई), निखिल गोरे (आर ओके-सीकेटी कॉलेज, पनवेल), विनोदी अभिनेता-संजय गोसावी आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), विशेष संगीत संयोजन-गौरव व शुभम वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), विनोदी एकांकिका (आरपार-फोर्थ वॉल, ठाणे), विशेष लक्षवेधी प्रयत्न-यंदा कर्तव्य आहे, सांघिक अभिनय-घरोटं (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई). सर्वोत्कृष्ट बालकलाकर -ग्रीष्मा पवार (12 किमी-एएसएम प्रोडक्शन, मुंबई), आरुष देवळेकर (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी); नेपथ्य : प्रथम क्रमांक-शुभम परखड, कार्तिक किनगे (कुणीतरी पहिलं हवं-बीएमसीसी, पुणे) द्वितीय क्रमांक-प्रमोद शेलार (शुद्धता गंरेंटेड अर्थात पाणी-मॉर्निंग ड्रीम एंटरटेनमेंट, मुंबई), तृतीय क्रमांक-प्रणय निवळकर, यश पवार (वण्डरिंग बोट-एमडी कॉलेज, मुंबई), चतुर्थ क्रमांक-देवशीस भरवडे, हरेश बाणे (बारस-कलांश थिएटर, रत्नागिरी), उत्तेजनार्थ : हेमंत वनगे, अमोल जाधव (घरोटं-नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई).  

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply