कळंबोली ः वार्ताहर
एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश सरकारकडून देण्यात येत आहे, तर दुसरीकडे तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या संख्येने वृक्षतोड केली जात असून, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या वृक्षतोडीविरोधात पनवेल महापालिका आणि वनविभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
पर्यावरणाचा र्हास रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांकडून वृक्षारोपणाचा संकल्प करून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ अशा प्रकारचा संदेश दिला जात आहे. पनवेल महापालिकेने यासाठी खास जैवविविधता नियंत्रण समिती स्थापन केली आहे. त्यातून ते पशूपक्षी त्याचबरोबर वनस्पतींचे संवर्धन केले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे; पण महानगरपालिकेच्या हद्दीतील तळोजा एमआयडीसीच्या बाजूला म्हणजे भूखंड क्रमांक- 31 डीसीपीएल या कंपनीच्या पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. महापालिका प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामध्ये खैर, ताड, कडुलिंब, ऐन, किंजळ, आंबा, नारळ यांसारख्या अनेक झाडांचा समावेश आहे.
तळोजा एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. हवेत विषारी वायू सोडले जात आहेत. या भागात वृक्ष असणे गरजेचे आहे; परंतु तोंडरे गावात मोठी वृक्षतोड सुरू आहे. परिसरात दीपक फर्टिलायझर या कंपनीने जवळपास 50 एकर क्षेत्र विकत घेऊन त्या ठिकाणी प्लांट टाकायचा आहे. या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने झाडे होती. त्याची सर्रास तोड करण्याचे काम सध्या सुरू आहे.
तळोजा एमआयडीसीलगत तोंडरे गावाच्या हद्दीत अशा प्रकारे झाडे तोडली जात असतील, तर त्वरित प्रभाग अधिकार्यांना सूचना दिल्या जातील आणि त्या जागेवर जाऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. या अगोदरही एमआयडीसी परिसरात झाडे तोडली म्हणून आम्ही गुन्हे दाखल केले आहेत.
-तेजस्विनी गलांडे, सहायक आयुक्त, पनवेल महापालिका