Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सकाळ सन्मान पुरस्कार प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त
कोरोना काळात समाजाप्रती देवदूताप्रमाणे दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. सकाळच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळ सन्मान 2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 31) प्रसिद्ध कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोना वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत केली. गोरगरीब, गरजूंना सहकार्य करून या संकटात फार मोठा दिलासा दिला. जनतेवर आलेल्या बिकट प्रसंगात ते आजवर  प्रत्येक वेळी मदतीचा हात देण्यासाठी धावून गेल्याचे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व अर्थात देवदूत अशी त्यांची जनमानसावर प्रतिमा कोरली गेली. गेली अनेक वर्षे जनतेच्या लहान-मोठ्या प्रश्नांकडे बारकाईने व जातीने लक्ष देणारे तसेच सतत माणसांमध्ये रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.
कोरोना महामारीमध्ये आपल्या दानतीचे व माणुसकीचे दर्शन घडविताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लाखो जणांना मदतीचा हात दिला. त्यांनी स्वखर्चातून दीड लाखांहून अधिक अन्नधान्याचे किट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वछता मोहीम, आर्थिक मदत तसेच अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, मास्कचे वाटप, गणेशोत्सव गोड करण्यासाठी 60 हजार जणांना प्रसादाचे अन्नधान्य अशी हरएक आवश्यक मदत केली.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्याकडील कष्टाने मिळविलेला खजिना परिस्थितीने गांजलेल्या गरीब, गरजूंसाठी अक्षरशः रिता केला. कितीतरी जणांना आसरा दिला. भूकेल्यांना जेवण दिले तेही कुठलाही गवगवा न करता. विविध संस्था, शिक्षण, पत्रकारिता, वाहतूक, व्यापार, बांधकाम, मोलमजूर, हॉटेलिंग अशा सगळ्याच छोट्या-मोठ्या व्यवसायांशी संबंधित सर्वांची काळजी घेतली आणि मदत करून सार्‍यांचे अश्रू पुसण्याचे महत्कार्यही केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोना काळात समाजाला स्वतःचे कुटुंब मानून केलेल्या मदतीची दखल घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यापूर्वीच त्यांना कोरोना देवदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर आता सकाळ समूहाने सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांना सकाळ सन्मान 2021 पुरस्काराने गौरविले आहे. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply