पनवेल : प्रतिनिधी
वाचन ही जीवनाची अजूनही गुरुकिल्ली आहे. ती अधिकाधिक लोकांच्या हाती जाऊन त्यांचे जीवन समृद्ध व्हावे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि. 7) येथे केले. रायगड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आयोजित वार्षिक अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. पनवेल येथील के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि रायगड जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथालय संघाच्या 55व्या वार्षिक अधिवेशनाला पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात रविवारी सकाळी प्रारंभ झाला. या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास रायगड जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोंदाडे, के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्ष सुनीता जोशी, शशिकांत बांदोडकर आदी मान्यवरांसह रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आलेले प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पिढी सुशिक्षित होईल, पण सुसंस्कृत होण्यासाठी आपल्या आवडीचे वाचून अवती-भवतीचे अनुभवले पाहिजे. अनेकांनी आपली आयुष्य पुस्तकरूपात मांडलीत. ती तरुणांच्या हाती गेल्यास त्यांचे जीवन अधिक समृद्ध होईल, असे सांगितले.