पनवेल : रामप्रहर वृत्त – एकविसाव्या शतकातल्या दुसर्या दशकाच्या अखेरच्या वर्षात संपूर्ण मानवजात एका अकल्पित आणि भयावह चक्रात सापडली आहे. कोरोना विषाणूच्या अनाकलनीय व्यूहात सारे जग व्यापून गेले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाची साथ आणि मानवता महत्वाची आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांनी केले.
आषाढी एकादशीनिमित्त ’विठू नामाचा गजर’ या धार्मिक कार्यक्रमाच्या खारघर येथून थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून विठूमाऊली भक्तांना दर्शन, भजन व आरतीचा लाभ घेता आला. त्यावेळी आपल्या अभंग वाणीतून सादरीकरण करताना ते बोलत होते.
कोरोना वैश्विक महामारीमुळे वारी शासनाने रद्द केली. त्यामुळे सर्व भक्तमंडळींना भजन, आरती व दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून मल्हार टिव्ही व सोशल मिडिया माध्यमांवर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांच्या अभंग गायनाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी भक्तांसमोर संवाद साधताना आषाढी वारीचे महत्व, कोरोना व गुरु आणि संगीत विषयक अनुभव या महत्वाच्या विषयांवर संवाद साधला. गायनासाठी त्यांना तबला साथ सुप्रसिद्ध छोटे उस्ताद कौस्तुभ भाग्यवंत तर मृदूंग साथ पं. एकनाथ भाग्यवंत यांची तर गायन साथ अक्षय चौधरी व मंगेश चौधरी यांची मिळाली.
माउलींच्या वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधूर गायनाच्या अभंग सुमनांजली थेट प्रक्षेपण कार्यक्रमातून माऊलीचे दर्शन घडविले, त्यावेळी 16678 भक्तमंडळींनी लाभ घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. त्याचप्रमाणे या हि कार्यक्रमाला हजारो भक्तगणांचा प्रतिसाद मिळाला.