Breaking News

शहरातील खड्डे बुजविण्यासाठी मुरूड संघर्ष समिती पुन्हा आक्रमक; नागरिकांच्या दारी जाऊन पैसे गोळा करण्याची तयारी

मुरूड : प्रतिनिधी

शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे असून, ते बुजविले जात नसल्याने पादचार्‍यांना खड्ड्यामधून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असूनसुद्धा मुरुड नगर परिषदेकडून त्याकडे लक्ष दिले जात नसल्याने मुरूड येथील संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. समितीच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी (दि. 11) नगराध्यक्षांच्या दालनात नगर परिषदेच्या पदाधिकार्‍यांची  भेट घेऊन शहरातील रस्ते लवकरात लवकर करण्याची मागणी केली. मुरूड शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली असून, या रस्त्यांच्या दुरूस्तीबाबत संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश वीरकुड, जाहिद फकजी, उदय चौलकर, दत्ता भोसले, प्रभाकर मसाल, निलेश भायदे, संजय डांगे, उद्धव मुंबईकर, मुझफर सुर्वे, संजय नाईक, इम्तियाज गोलंदाज, नदीम भारूम, सुशांत सतविडकर, दत्ता भोसले यांनी गुरुवारी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, बांधकाम सभापती मेघाली पाटील, पाणी पुरवठा सभापती पांडुरंग आरेकर व मुख्याधिकारी अमित पंडीत यांची भेट घेतली. मागील वेळी शहरातील रस्ते बनतील तेव्हा बनतील, आम्ही खड्डे बुजवून देऊ, असे आश्वासन दिले होते, तरीही  खड्डे बुजविण्याचे विसरलेत कसे, आमची फसवणूक का केली, असा सवाल समितीचे अध्यक्ष प्रकाश वीरकुड यांनी या वेळी झालेल्या चर्चेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना नगराध्यक्षा स्नेहा पाटील व मुख्याधिकारी अमित पंडित यांनी सांगितले की, सध्या निधी उपलब्ध नसल्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम करता आले नाही. परंतु रस्ते दुरूस्तीचा नवीन प्रस्ताव तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी पाठवला आहे, त्यास मान्यता आल्यावर खड्डे बुजविले जातील. खड्डे बुजविण्यासाठी 12लाख 50हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, त्यासाठी नगर परिषद तयारी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. नगर परिषदेकडे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी पैसे नसतील तर शहरातील नागरिकांच्या घरी जाऊन संघर्ष समिती पैसे गोळा करून नगर परिषदेला देण्यास तयार आहे, त्यास आपण परवानगी द्यावी, अशी मागणी संघर्ष समितीचे सदस्य जाहिद फकजी यांनी केली. त्याला  समितीचा सर्व सदस्यांनी दुजोरा दिला. मात्र तांत्रिक मान्यता मिळताच त्वरित खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन नगर परिषदेतर्फे देण्यात आले.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply