Breaking News

उर्वरित कसोटींसाठी रोहित की अजिंक्य?

बीसीसीआयचा अजिंक्यच्या नावाला दुजोरा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
 मोहम्मद शमी व उमेश यादव यांनी ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून माघार घेतल्याचे अखेर बीसीसीआयने शुक्रवारी (दि. 1) जाहीर केले. पहिल्या कसोटीत शमी, तर दुसर्‍या कसोटीत उमेश दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर दोघे ऑस्ट्रेलिया दौर्‍यातून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आणि तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या, पण याबाबत कोणतेच अधिकृत वृत्त आले नव्हते. अखेरीस शुक्रवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. याचबरोबर रोहित शर्मा उर्वरित कसोटींसाठी मैदानावर उतरला. त्यामुळे उर्वरित कसोटींमध्ये अजिंक्य रहाणे किंवा रोहित यापैकी कोण नेतृत्व सांभाळणार याची चर्चा सुरू झाली आहे.
अ‍ॅडलेड कसोटीत पॅट कमिन्सने टाकलेला चेंडू शमीच्या हातावर जोरात आदळला आणि वेदनेसह त्याने मैदान सोडले. शमीला पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवडे लागतील आणि त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचे खेळणे अनिश्चित आहे. हातावरील प्लास्टर काढल्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. त्यात दुसर्‍या कसोटीत उमेशला दुखापत झाली अन् त्यालाही माघार घ्यावी लागली आहे. या दोघांच्या जागी टी. नटराजन आणि शार्दूल ठाकूर यांना स्थान देण्यात आले आहे.
6 डिसेंबरला सिडनी येथे आलेल्या रोहितने 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आणि आता तो तिसर्‍या कसोटीसाठी मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी हिटमॅन मेलबर्नला दाखल झाला आणि त्याने सहकार्‍यांची गळाभेट घेतली. इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या पर्वात रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहितला मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते. भारताचा 32 सदस्यीय ताफा ऑस्ट्रेलियाला रवाना झाला, परंतु रोहित वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतला. तेथून तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. तेथून तंदुरुस्ती चाचणी पास करून तो ऑस्ट्रेलियात दाखल झाला.
रोहित शर्मा टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी कोण सांभाळेल अशी चर्चा सुरू झाली आहे, पण बीसीसीआयने स्पष्ट केले की, अजिंक्यच दोन्ही कसोटींत नेतृत्व करणार आहे. रोहितकडे उपकर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply