मोदींचा हल्लाबोल
कूचबिहार ः वृत्तसंस्था : ममता बॅनर्जी यांनी राजकीय फायद्यासाठी पश्चिम बंगालमधील घुसखोरांना वाचवून आपल्या मातीसोबत विश्वासघात केला आहे. त्यांनी पश्चिम बंगालच्या लोकांना तृणमूल काँग्रेसच्या गुंडांच्या हवाली करून स्थानिकांच्या अपेक्षांचा भंग केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममदा बॅनर्जी यांच्यावर केली. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी आले होते. या वेळी येेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कूचबिहारमध्ये घेतलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता यांच्या ‘माँ-माटी-मानुष’ या घोषणेवरही टीकास्त्र सोडले.
पश्चिम बंगाल राज्याच्या विकासात ममता बॅनर्जी ‘स्पीड ब्रेकर’ ठरत आहेत, असा टोलाही या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. इतर राज्यांप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये गतीने विकास होऊ शकला नाही हे खरं आहे. याचे कारण पश्चिम बंगालमध्ये स्पीड ब्रेकर आहे ज्याला दीदी म्हणून ओळखले जाते. त्यांना गरिबी हटवायची नाही. जर गरिबी संपली तर त्यांचे राजकारणही संपेल. त्यांना गरिबी पाहायची आहे आणि यामुळे त्यांनी गरिबांसाठी सुरू असणारे विकास प्रकल्प थांबवले आहेत. भाजपा सरकारने मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे पाहून ममता बॅनर्जी यांना आपल्या अस्तित्वाची भीती वाटू लागली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ममता अस्वस्थ झाल्या आहेत. त्या खूप घाबरल्या असून, त्यांची झोप पुरती उडाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या ज्या योजना थांबवल्या आहेत, त्यांची यादी मोठी आहे. स्पीड ब्रेकर दीदींनी केंद्राच्या योजना रोखल्या नसत्या, तर आज अनेक योजनांचा तुम्हाला लाभ मिळाला असता. तुम्ही केंद्रात आम्हाला बळकट केलेत, तर दीदींना झुकावे लागेल आणि तुमच्यासाठी विकासकामे करावीच लागतील. त्यांची मनमानी आता चालणार नाही, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
दीदींचा खरा चेहरा जगासमोर आणणे गरजेचे आहे. आजपर्यंत येथील जनतेला त्यांनी विकासापासून कोसो दूर ठेवले आहे. त्यांच्या कार्यकाळात राज्याचा विकास कितीतरी पटीने मागे पडला आहे. त्यांना पश्चिम बंगालमधील सर्वसामान्य जनतेशी काहीही देणेघेणे नाही. त्या पश्चिम बंगालची संस्कृती, येथील नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त करीत आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी केला. हा चौकीदार तुमच्या हिताचे रक्षण करण्यात कधीही कमी पडणार नाही. देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांच्या रक्षणासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे.
कोणत्याही एका धर्माच्या नागरिकांसाठी आमचे सरकार काम करीत नाही. देशातील कोट्यवधी लोकांचे जीवनमान सुसह्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या सरकारकडून करण्यात येत आहे. भ्रष्टाचार करणार्यांकडून हा चौकीदार सगळे हिशेब घेतल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासनही या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.