पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोने टाळेबंदी सुरू असताना भरमसाठ पाणीपट्टी वाढवली आहे. या तिप्पट पाणी देयकला पनवेल महापालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी विरोध केला आहे. इतकेच नाही तर वसाहती विकसित करणार्या सिडको प्राधिकरणाने आपली बांधीलकी उचलत शंभर टक्के पाणी बिल माफ करावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांना खरमरीत पत्र पाठवले आहे. याबाबत सिडकोने रहिवाशांवर लादलेला जुलमी निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दिला आहे.
सध्या कोरोना या महामारी रोगाने थैमान घातले आहे. गेल्या दोन महिन्यापासून या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरू आहे. अनेकांचा कामधंदा बुडालेला आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हे संकट नेमके कधी टळेल याबाबत कोणालाही काही सांगता येत नाही. एकंदरीतच या वैश्विक संकटामध्ये अनेक कुटुंबांचे आर्थिक हाल सुरू झाले आहेत. पोटाची खळगी कशी भरायची, आपला व कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा यक्षप्रश्न सर्वसामान्यांसमोर उभा राहिला आहे. त्यातच एकविसाव्या शतकातील विकासित शहरे अशी बिरुदावली मिरवणार्या सिडको या सर्वात श्रीमंत महामंडळाने मात्र या संकटात कोणतीही सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसत नाही. किंवा आपला वाटा ही उचललेला ऐकिवात नाही. या वेळी सर्वसामान्यांना मदत करायचे सोडून त्यांच्यावर हुकूमशाही पद्धतीने पाणीपट्टी लादली असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सिडको विरोधात संपूर्ण वसाहतीमध्ये असंतोष पसरलेला आहे.
एकीकडे कोरोना मुळे हवालदिल झालेल्या जनतेवर तिप्पट पाणीपट्टी वाढवून सिडकोने मोठा अन्याय केल्याची भावना सध्या आहे. दरम्यान या वाढीव पाणीपट्टीला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक समीर ठाकूर यांनी तीव्र विरोध केला आहे. नवीन पनवेल शहराला 45 एमएलडी पाण्याची गरज असताना फक्त 34 ते 35 एमएलडी पाणी मिळत असल्याने तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागणीप्रमाणे सिडको पाणीपुरवठा करू शकत नाही. प्राधिकरणाकडून सातत्याने एमजेपीकडे बोट दाखवले जात आहे. मात्र पाण्याचे दर तिप्पट वाढवताना सिडको या सर्व गोष्टींचा विचार केला नसल्याचे ठाकूर यांनी सांगितले. प्राधिकरणाने हे वाढीव दर रद्द करावेच, मात्र आपली काहीतरी जबाबदारी समजून या वैश्विक संकटात संपूर्ण पाणी बिल माफ करावे, अशी मागणी समीर ठाकूर यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना दिलेल्या पत्रात
केली आहे.
याबाबत ठोस निर्णय झाला नाही तर सिडकोविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठवून त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यात आली आहे.
नवीन पनवेलकरांवर लादलेला पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय मागे घेण्याची सिडको प्रशासनास विनंती केली आहे. नागरिक कोरोनाच्या संकटात सापडलेले असताना मार्च महिन्यापासून पाणीपट्टीची मोठी दरवाढ करण्याचा कारनामा सिडकोने केला आहे. ही अवास्तव दरवाढ तातडीने रद्द करा आणि लॉकडाऊनमधील पाणीपट्टीची बिले संपूर्णतः माफ करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सिडकोला दिला आहे.
-समीर ठाकूर, नगरसेवक, पमपा