Breaking News

पहिल्या दिवशी भारताची त्रिशतकी मजल

चेन्नई : वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत पहिल्या दिवसाखेर भारतीय संघाने 6 बाद 300 धावांपर्यंत मजल मारली. गेल्या काही सामन्यांत टीकेचे लक्ष ठरणार्‍या सलामीवीर रोहित शर्माने धडाकेबाज दीडशतक ठोकले. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाले असताना रोहितला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिल्याने भारताला मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करता आली. इंग्लंडकून जॅक लीच आणि मोईन अली दोघांनी 2-2 बळी टिपले.
कर्णधार विराटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन शून्यावर बाद झाला. रोहितने पुजाराच्या साथीने डाव पुढे नेला, पण पुजारा 21 धावांवर माघारी परतला. पाठोपाठ विराटदेखील शून्यावर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर दोन मुंबईकरांनी भारताच्या डावाला आकार दिला. रोहित आणि अजिंक्य या दोघांनी 152 धावांची भागीदारी केली. 231 चेंडूंत 161 धावा काढून रोहित बाद झाला. त्याने 18 चौकार आणि दोन षटकार लगावले. रोहित माघारी परतल्यानंतर भारताने झटपट गडी गमावले. अजिंक्य अर्धशतकी खेळी करून त्रिफळाचीत झाला. त्याने नऊ चौकारांसह 67 धावा केल्या. रविचंद्रन अश्विनदेखील 13 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऋषभ पंत (33) आणि अक्षर पटेल (5) यांनी खेळपट्टीवर सांभाळली आणि संघाला तीनशेचा आकडा गाठून दिला.
हिटमॅन रोहितचे विक्रमी शतक
कोरोना संकटामुळे प्रेक्षकांना स्टेडियमवर येण्याची परवानगी नव्हती, परंतु जवळपास एका वर्षानंतर प्रेक्षक परतले आणि रोहितने त्यांचे शतकाने स्वागत केले. या शतकासह रोहितने कुणालाच न जमलेला विक्रम नावावर केला. रोहितने 130 चेंडूंत 14 चौकार व दोन षटकारांसह शतक पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे सातवे शतक ठरले. याचसोबत श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चारही संघांविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला, तर घरच्या मैदानावर सातही कसोटी शतके करणारा रोहित हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीनने सहा शतके घरच्या मैदानावर केलीत.
अजिंक्य रहाणेचा पराक्रम
विराट कोहलीच्या भोपळ्याची अन् रोहित शर्माच्या फटकेबाजीची चर्चा होत असताना अजिंक्य रहाणेने दुसर्‍या कसोटीत मोठा पराक्रम करून दाखवला. आशियातील एकाही फलंदाजाला न जमलेली कामगिरी अजिंक्यने केली. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत एक हजार धावा करणार्‍या पहिल्या आशियाई फलंदाजाचा मान अजिंक्यने पटकावला. सर्वाधिक धावांमध्ये मार्नस लाबूशेन (ऑस्ट्रेलिया) 1675, जो रूट (इंग्लंड) 1550, स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) 1341, बेन स्टोक्स (इंग्लंड) 1220 अनुक्रमे पहिल्या चार क्रमांकांवर असून, अजिंक्य रहाणे (भारत) 1051 पाचव्या स्थानी आला आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply