Breaking News

बाजारात उत्तम वेळ साधाल तर फसाल!

बाजार वरती गेल्यास बाजारास पूरक वातावरण कसं तयार झालंय वगैरेबद्दल विश्लेषक चर्चा करतात व बाजार पडल्यावरदेखील नफेखोरीमुळं बाजार कसा पडला हेदेखील तितकंच जोरकसपणे सांगतात. म्हणूनच कोणावर अवलंबून न राहता व बाजारातील गुंतवणुकीबाबत उत्तम वेळ साधायचा प्रयत्न न करता जोखीम मोजून केलेली गुंतवणूक ही नक्की चांगला परतावा देऊ शकते.

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,

देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक;

त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,

किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते.

अक्षरगण वृत्तांमधील शार्दूलविक्रीडित ह्या वृत्तात बांधलेली ही कविता आहे केशवकुमार म्हणजेच सुप्रसिद्ध साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची. ह्या ओळी आठवायला मागील दिवसांत एक प्रसंग घडला.

मागील आठवड्यात आमच्या एका मित्राचं प्रमोशन झालं. लॉकडाऊननंतर लगेच बढती म्हटल्यावर पार्टी तो बनती हैं, असं म्हणून आम्ही 3-4 जवळच्या मित्रांनी रात्री बाहेर जेवायचा बेत ठरवला आणि बिल त्या मित्रानं द्यायचं असं ठरलं. जो पार्टी देणार होता त्याच्या घराच्या इथं एकत्र जमायचं आणि एका लांब राहणार्‍या मित्राला वाटेत पिकअप करून तसंच पुढं जायचं ठरलं. अगदीच पलीकडच्या गल्लीत राहणारा मित्र असल्यानं मी चालतच वेळेत त्याच्या घरी पोहचलो, परंतु दुसर्‍या मित्राचा पत्ता नाही. मग त्याला फोन केला तर महाशय घरातून निघाले होते. पुन्हा 15 मिनिटांत फोन केल्यावर पाच मिनिटांत पोहचतोय, असं सांगून फोन कट केला गेला. आम्ही तिघं पौड रोडला चौथ्याकडं जातानादेखील हीच तर्‍हा. निघताना आम्ही त्याला तसं कळवलं वर आमचं गुगल लाइव्ह लोकेशन शेअर केलं तरीही त्याच्या घराजवळ आल्यावर पुन्हा एकदा फोन करून कळवण्यात आलं आणि तरीदेखील ही व्यक्ती आम्ही त्याच्या घराबाहेर पोहचल्यावर पाच मिनिटांनी आली. आता वरवर पाहता यात काहींना वावगं असं काही वाटणार नाही. इथं समस्या आहे ती अधीर वृत्तीची. मला आठवतंय, आम्ही कॉलेजमध्ये असताना म्हणजे सुमारे 1994-97च्या काळात आमच्या चार मित्रांची चौकडी होती. कोठेही जाणार तर एकत्रच. त्यातून चारी जण चार वेगळ्या कॉलेजमध्ये तरीही ठरावीक वेळी आम्ही ठरलेल्या किंवा ठरवलेल्या जागी एकत्र येणार म्हणजे येणारच तेसुद्धा जवळ मोबाइल किंवा पेजर्स नसतानादेखील. अशा प्रकारचा अनुभव थोड्याफार फरकानं प्रत्येकानं

घेतलादेखील असेलच. वरील कविता आपल्याला आजीजवळील नसलेल्या घड्याळाबद्दल परंतु तिच्या अचूक टायमिंगबद्दल सांगते, तर कॉलेजचे दिवस आपणांस वेळ पाळण्याबद्दल आठवण देतात. सांगायचा हेतू काय तर आज आम्ही प्रत्येक कृतीसाठी इतर गोष्टींवर अवलंबून राहू लागलोय. खासकरून टायमिंगच्या बाबतीत. निघताना कॉल करणं, घराखाली आलं की मिस कॉल देणं, मग मिनिटभरात चाहूल न लागल्यास पुन्हा एकदा कॉल करून पाहणं, इ. एकूणच काय तर आम्ही टायमिंगच्या बाबतीत फारच संवेदनशील झालोय, जरा म्हणजे जराही सहनशीलता, सोशिकता म्हणून नाही.

आता हेच आपल्या बाजाराच्या  बाबतीतदेखील घडतंय. मागील वर्षभर रॉबिनहूड म्हणजेच बाजारात नव्यानं आलेल्या गुंतवणूकदारांनी खोर्‍यानं पैसे कमावले. कारण एकतर मार्चमधील तळापासून बाजार एकसलगपणे वरच जात असून नवख्या गुंतवणूकदारांना बाजारामधील आधीच्या पडझडीचा थेट अनुभव नसल्यानं त्यांनी बाजार खूप वाढला आहे म्हणून गुंतवणूक काढून न घेता तशीच ठेवून दिलेली आहे. याउलट मुरलेल्या गुंतवणूकदारांना ही तेजी मोठा फुगा वाटत असल्यानं त्यांनी बाजार तळात असताना केलेली गुंतवणूक थोडासा नफा मिळाल्यावर लगेच विकून टाकलेली दिसते, जेणेकरून बाजार पुन्हा खाली आल्यास त्यात पुनर्खरेदी करता येऊ शकेल. ज्यांनी आपली गुंतवणूक साधारणपणे जून महिन्यात काढून घेतली त्यांचा कयास असावा की एप्रिल-जून या तिमाहीचे कंपन्यांचे निकाल सुमार येतील. कारण टाळेबंदीमुळं विक्री, व्यवसाय यामध्ये वृद्धी झालेली नसून त्याचा फटका कंपन्यांना बसून बाजार पुन्हा खाली येऊ शकतो, परंतु झालं उलट. कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा बरे आले व बाजार खाली आला नाही. हेच जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या बाबतीत घडलं. नंतर सणासुदीमुळं बाजारात तेजी टिकून राहिली आणि सर्वांचा कयास होता की जानेवारीमध्ये बाजार जोरदार आपटी खाईल म्हणून जाणकार गुंतवणूकदार पुन्हा काठावरच बसलेले आढळले व अर्थसंकल्पानंतर काहीतरी मोठी वध-घट होईल या भीतीनं कोणीही बाजारात गुंतवणुकीसाठी फिरकलं नाही. अशीही यादी कधीच संपत नसते, मात्र या प्रकारच्या घडामोडींमुळं बाजार पडेल व मग आपण तुलनात्मक कमी भावात खरेदी करू हा विचार किती जरी आश्वासक वाटत असला तरी त्यामुळं निराशाच पदरी पडते. बाजारात भीती व लालसा या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दोन्हीमुळं आपलं नुकसान होऊ शकतं आणि म्हणूनच प्रत्येक गुंतवणूकदारानं आपल्या विवेकास प्राधान्य दिलं पाहिजे.

मी नेहमीच सांगत आलोय की जर तुम्ही एक ट्रेडर असाल तर बाजारात आपल्या लावलेल्या भांडवलावर (गुंतवणुकीवर) 15-20 टक्के नफा मिळाल्यास तो काढून घ्या आणि जर तुम्ही दीर्घकाळासाठी (5-10 वर्षे आणि पुढं) गुंतवणूक केली असल्यास 10-15 टक्के नफा दिसल्यावर आपल्या गुंतवणुकीतून बाहेर पडण्याची घाई करू नका. कारण त्याच कंपनीचा शेअर पुढं दोन-पाच वर्षांत दुप्पट-तिप्पट होऊ शकतो, मात्र अशा कंपन्यांच्या ताळेबंदावर व त्यांच्या व्यवसाय प्रणालीवर लक्ष देऊन असा. उदाहरणच द्यायचे तर जुलै 2020नंतर तेजी पकडलेला अदानी इंटरप्रायझेसचा शेअर 145 रुपयांवरून थेट 700 रुपयांवर पोहचला आहे. नोव्हेंबर 2020मध्ये 145 रु. असणारा टाटा मोटर्सचा शेअर आज सव्वातीनशे झालेला आहे. बजाज फायनान्सचा शेअर 1800 रुपयांवरून तिप्पट म्हणजे 5500 रुपयांच्या वर गेलेला आहे. अशी एक नाही तर अनेक उदाहरणं देता येतील, जी सर्वसामान्यांना माहिती असणार्‍या कंपन्यांबाबत आहेत.

बाजारातील विश्लेषक हे बाजार वरती गेल्यास बाजारास पूरक वातावरण कसं तयार झालंय वगैरेबद्दल चर्चा करतात व बाजार पडल्यावरदेखील नफेखोरीमुळं बाजार कसा पडला हेदेखील तितकंच जोरकसपणे सांगतात. म्हणूनच कोणावर अवलंबून न राहता व बाजारातील गुंतवणुकीबाबत उत्तम वेळ साधायचा प्रयत्न न करता जोखीम मोजून केलेली गुंतवणूक ही नक्की चांगला परतावा देऊ शकते. आता पुढील काही महिने काठावरच बसणार्‍यांसाठी फारशी जोखीम न घेता काय पर्याय आहेत ते पुढील लेखात पाहू.

सुपर शेअर : पिरामल एन्टरप्रायझेस

गेल्या आठवड्यात बाजारानं जरी नवीन उच्चांक नोंदवला असला तरी बाजारात एकूणच तेजीचा जोश नव्हता. तरीदेखील निफ्टीनं 15257 तर सेन्सेक्सनं 51835 हे ऐतिहासिक उच्चांक आठवड्याच्या दुसर्‍याच दिवशी नोंदवले व पुढील तीन दिवस बाजार या उच्चांकाखालीच घुटमळत राहिला. शेवटच्या दिवशी पिरामल एन्टरप्रायझेसच्या शेअरनं आपला 1750 हा 52 आठवडी उच्चांक नोंदवत आठवड्याभरात एकूण साडेतेरा टक्के वाढ दर्शवली. पिरामल समूहाचे चेअरमन अजय पिरामल हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे व्याही आहेत. फार्मास्युटिकल, आर्थिक सेवा, रिअल इस्टेट व काच आवेष्टन हे पिरामल समूहाचे प्रमुख व्यवसाय आहेत. त्यापैकी पिरामल इंटरप्रायझेसचे आर्थिक सेवा व औषधनिर्माण हे प्रमुख व्यवसाय आहेत. दिवाण हाऊसिंग फायनान्स या दिवाळखोरीत जात असलेल्या कंपनीसाठी पिरामल समूहानं 34250 कोटी रुपयांचा प्रस्ताव डीएचएफएल कमिटीनं स्वीकारला आहे. त्याचबरोबर गेल्या तिमाहीत कंपनीनं जाहीर केलेल्या निकालानंतर बाजारातील विश्लेषकांनी कंपनीच्या शेअर्सच्या भावाचं लक्ष्य वृद्धिंगत केल्यानं (1900 ते 2100) या शेअरमध्ये तेजी आली. मागील वर्षी संपलेल्या या तिमाहीपेक्षा कंपनीनं 10 टक्के नफावृद्धी दर्शवलेली असून विक्री 15 टक्क्यांनी वधारली आहे. मागील तीन वर्षांचा आलेख पाहता 3300 रुपयांवर व्यवहार होत असलेला हा शेअर आजही 45 टक्के सवलतीत मिळत आहे.

-प्रसाद ल. भावे(9822075888), sharpfinvest@gmail.com

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply