Breaking News

संक्रमण काळात दिलासा

देशात महाराष्ट्र राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढतच असून, मुंबईतील हा धोका तेथे अत्यावश्यक सेवांसाठी दररोज कामाला जाणार्‍यांद्वारे मुंबईजवळच्या जिल्ह्यांत पसरत आहे. याकडे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या मागणीला यश आले आहे.

संसर्गजन्य कोरोनाचा एव्हाना आपल्या देशात गुणाकार सुरू झाला असून, हा विषाणू झपाट्याने सर्वत्र पसरत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. सुरुवातीला परदेशातील अगर परराज्यांतील कोरोनाबाधितांमुळे या संसर्गाचा आपल्याकडे प्रादुर्भाव होत होता. त्यानंतर लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली. इतर निर्बंधही घालण्यात आले. आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवा बंद करण्यात आली. त्याचप्रमाणे आंतरराज्यीय सीमादेखील सील केल्या गेल्या, पण तोपर्यंत कोरोनानामक महामारीने देशात शिरकाव केलेला होता. या संकटावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान आणि केंद्राच्या मार्गदर्शनानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश कार्यरत आहेत. सरकारच्या माध्यमातून विविध निर्णय, उपाययोजना केल्या जात असताना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा काम करीत आहेत, तर वैद्यकीय क्षेत्रही सेवा देत आहे. या सर्व प्रयत्नांमुळे काही रुग्णबरे होताना दिसून येते. लहानग्या बालकांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केलेली आहे, पण नवे रुग्ण सातत्याने आढळत असल्याने धोका कायम आहे. ग्रामीण भागांच्या तुलनेत शहरी पट्ट्यात रुग्णसंख्या कमालीची वाढत आहे. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी मुंबईसारख्या शहरात नियमित ये-जा करणार्‍यांना मोठ्या प्रमाणावर लागण होत असून, त्यांच्या माध्यमातून या संसर्गाचा फैलाव ही मंडळी राहत असलेल्या मुंबईबाहेरील जिल्ह्यांमध्ये होत आहे. पनवेलमधील सुमारे 80 ते 90 टक्के रुग्ण त्यांच्यापैकीच असल्याचे समोर आले आहे. सध्याच्या घडीला अत्यावश्यक सेवा देणार्‍यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात त्यांचे योगदान नक्कीच मोलाचे आहे, परंतु ते मुंबईत जात असल्याने कोरोनाची लागण त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना व आजुबाजूच्यांना होत आहे. ही बाब गंभीर आहे. म्हणूनच भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष असलेले पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचप्रमाणे याबाबत कार्यवाही न झाल्यास 4 मेपासून पनवेलमधील अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवहार बंद करण्याचा इशाराही दिला होता. त्याची मुंबई महापालिकेने दखल घेत आपल्या कर्मचार्‍यांची मुंबईतच राहण्याची व्यवस्था करण्याचे जाहीर केले. त्यामुळे पनवेलसह इतर ठिकाणच्या रुग्णसंख्येला आळा बसण्यास मदत होणार आहे. मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयामुळे पनवेल बंद रद्द करून या निर्णयाला पाठिंबा देणारे सर्व नागरिक, हाऊसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आभार मानले आहेत. आता याच धर्तीवर मुंबई पोलिसांची व्यवस्था राज्य शासन अथवा मुंबई महापालिका करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मंडळी, या लढाईत सर्वच घटकांनी जबाबदारपणे कार्यवाही-कृती केल्यास निश्चितपणे कोरोनाला हरविणे शक्य आहे.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply