मुंबई : प्रतिनिधी
महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ‘महाराष्ट्रात विकास होईल अशी वेडी आशा भोळीबाभडी जनता करीत आहे, पण विकास करण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांकडे आहे ते मंत्री कोणत्या ना कोणत्या तरी घोटाळ्यात व कारनाम्यात फसले आहेत. पुण्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याचे नाव झळकत आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच कथित पत्नीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुले असल्याच्या भानगडीची कबुली दिली. संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्याप राजीनामा दिला नाही. काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या जावयाला ईडीने ड्रग्स प्रकरणात अटक केली होती, तर एका कॅबिनेट मंत्र्यांनी थेट पोलीस कर्मचार्यांना मारहाण केल्याने न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. आणखी एक मुजोर कॅबिनेट मंत्र्याने आपल्या विरोधातील फेसबुक पोस्ट सहन न झाल्यामुळे इंजिनिअर युवकाला मारहाण केली होती आणि स्वतः ते मंत्री मारहाणीच्या वेळी उपस्थित होते’, अशी उदाहरणे देत पाटील यांनी टीका केली आहे.