Breaking News

महात्मा फुले महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बुधवारी (दि. 4) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोकण विभागाचे माजी सहसंचालक (उच्च शिक्षण) डॉ. संजय जगताप उपस्थित होते, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूषविले.
कार्यक्रमास संस्थेचे जनरल बॉडीचे सदस्य वाय.टी. देशमुख, महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष परेश ठाकूर, सदस्य विजय लोखंडे, प्रसाद ढवळे आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही तसेच जिथे संधी मिळेल तिथे काम करता आले पाहिजे, असा संदेश दिला. माणूस कामाने मोठा होतो. जो व्यक्ती कोणतेही कार्य मनापासून व त्यागपूर्ण रितीने करतो तो खरा माणूस, असे सांगून ते पुढे म्हणाले की, देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे’ या प्रसिद्ध ओळींप्रमाणे आपण स्वतःला घडवले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले अशा थोर महापुरुषांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी.
माजी सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी सांगितले की, विज्ञान खूप पुढे गेले आहे, आज आपण या टेक्नोलॉजीच्या युगात आहोत. एआयचे जग आहे. त्यात चांगले आणि वाईट काय आहे हे ओळखून आपण त्याचा वापर मर्यादित व आवश्यक ठिकाणीच केला पाहिजे. भारत 2047पर्यंत जगातील तिसरी महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि ते नक्कीच यशस्वी होईल यात शंका नाही.
आपल्या भाषणात पुढे बोलताना डॉ. जगताप यांनी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आदर्शवत जीवनगाथा नक्कीच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भित्तीपत्रिका, रांगोळी, चित्रफितीचे कौतुक केले.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गणेश ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्था आणि महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व कार्यक्रमाचे कार्यवाह डॉ. रमेश म्हात्रे यांनी महाविद्यालयातील सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला. अमिषा भगत या विद्यार्थिनीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाषण केले.
कार्यक्रमास रजिस्ट्रार अनंता जाधव, माजी उपप्राचार्य डॉ. राजाराम पाटील, डॉ.एन.आर.मढ़वी, सुनिता काटकर, ललिता औचिते, प्रा. सतीश ढगे, विद्यार्थी परिषद अध्यक्ष ममता चव्हाण, सचिव हर्षदा नाईक हेही उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गायकर, डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, डॉ.यशवंत उलवेकर व प्रा. शरयू नाईक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ममता चव्हाण हिने मानले.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply