पोलादपूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांची विविध लेखकांनी लिहिलेली चरित्रे सर्वश्रृत आहेत, मात्र शिवचरित्रातून काय बोध घ्यावा, त्यांच्या कोणत्या प्रसंगातून प्रेरणा घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन जय शिवराय या पुस्तकातून घडते, असे मत शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केले. पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे आयोजित शिवव्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. दिवंगत माध्यमिक शिक्षक उदय शिंगटे यांची पुस्तके प्रकाशित करणार्या त्यांच्या पत्नी सुप्रिया आणि मातोश्री यांचा कापडे बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अजय सलागरे व देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. रवींद्र सोमोशी, पोलादपूर पं. स.चे उपसभापती शैलेश सलागरे, मराठी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष शैलेश पालकर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार सुभाष जगदाळे, सुरेंद्र जाधव, अमर सलागरे, नारायण साने उपस्थित होते.