बंगळुरू : वृत्तसंस्था
बंगळुरूने यंदाच्या आयपीएल मोसमातली आपली निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दिल्लीने बंगळुरूचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या पराभवामुळे यंदाच्या पर्वातील बंगळुरूचा हा सलग 6वा पराभव ठरला आहे. बंगळुरूने विजयासाठी दिलेल्या 150 रनचे आव्हान दिल्लीने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. दिल्लीने विजयी आकडा 7 चेंडू शिल्लक ठेवत गाठला. दिल्लीचा हा यंदाच्या मोसमातला तिसरा विजय ठरला आहे. दिल्लीची टीम 6 पॉईंटसह अंकतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे. बंगळुरूच्या सलग 6व्या पराभवामुळे आयपीएलच्या या पर्वातील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.
दिल्लीकडून मुंबईकर श्रेयस अय्यरने अर्धशतकी खेळी केली. त्याने 67 रन केल्या, तर पृथ्वी शॉ आणि कॉलीन इंग्राम यांनी अनुक्रमे 28 आणि 22 धावांची खेळी उभारली. बंगळुरूकडून फिरकीपटू युजवेंद्र चहलने 2, तर टीम साऊथी, पवन नेगी, मोहम्मद सिराज आणि मोईन अली या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट मिळवली. विजयी लक्ष्याचा पाठलाग करायला आलेल्या दिल्लीची सुरुवात वाईट झाली. शिखर धवन भोपळा न फोडता माघारी परतला. यानंतर मुंबईकर पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर या जोडीने दुसर्या विकेटसाठी 68 रन जोडले. पृथ्वीच्या रूपात दिल्लीने दुसरी विकेट गमावली. पृथ्वीने 28 धावा केल्या.
म्हणून घातली हिरव्या रंगाची जर्सी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आज दिल्लीविरुद्धच्या सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरल्याचे आपण पाहिले. बंगळुरूचा संघ 2011 पासून दरवर्षी आयपीएलच्या एका सामन्यात पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आणि ग्लोबल वॉर्मिंगबाबतच्या जनजागृतीसाठी हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये मैदानात उतरतो. या वर्षीही बंगळुरूने ती परंपरा कायम ठेवली आहे. नाणेफेकीवेळी विराट कोहलीने दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरला एक झाड भेट म्हणून दिले. जनजागृतीसाठी विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ दरवर्षी आयपीएलमध्ये एक सामना हिरव्या रंगाची जर्सी घालून खेळतो.