Breaking News

विद्युत तारेच्या संपर्कात आल्याने आठ वर्षीय मुलाचा मृत्यू

खोपोली ः बातमीदार
विद्युतवाहक तारेच्या संपर्कात आलेल्या आठ वर्षीय सीजम संजय चितोडिया (सध्या रा. साजगाव) या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खालापुरातील साजगाव येथे गुरुवारी (दि. 30) दुपारी घडली. बुधवारी संध्याकाळी वादळी वार्‍यासह पावसाच्या तडाख्यामुळे खालापूर तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब आणि झाडे कोसळली होती. गुरुवारी सीजम याच अवकाळी पावसाचा बळी ठरला.
साजगाव विठ्ठल मंदिराच्या पायथ्याशी अनेक मजूर कुटुंबे राहत असून सीजम हा खेळता खेळता मंदिर परिसरात टेकडीजवळ गेला असता तुटलेल्या विद्युत तारेच्या संपर्कात आला. तारेतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने सीजमला विजेचा जोरदार झटका लागून तो जागीच गतप्राण झाला. बर्‍याच वेळानंतर ही घटना सीजमच्या आईवडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला. घटनेची माहिती स्थानिकांनी महावितरण तसेच खोपोली पोलीस ठाणे येथे दिल्यानंतर वीजपुरवठा खंडित करून सीजमच्या मृतदेहाचा घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत संबंधित विभागाला योग्य त्या सूचना देऊन मृत सीजमच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सीजमचा मृतदेह खालापूर येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply