Breaking News

जलदुर्गांवर जाण्यासाठी तरंगत्या जेट्टीची प्रतीक्षा

मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा व पद्मदुर्ग या समुद्रातील किल्ल्यांवर जाण्यासाठी तरंगती जेट्टी व्हावी, अशी अपेक्षा गेल्या कित्येक वर्षांपासून पर्यटक व स्थानिक नागरिक करीत आहेत. मात्र पुरातत्व विभाग व महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड या खात्यांमध्येच सुसंवाद नसल्याने या ठिकाणी तरंगती जेट्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तरंगती जेट्टी उभारण्याच्या कामाला सुरुवात होत नसल्याने पर्यटकांना  त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जंजिरा किल्ल्यावर दरवर्षी पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक येत असतात. किमान जंजिरा किल्ल्यावर तरी तरंगती जेट्टी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.

 मुरूडजवळ समुद्रात असलेल्या जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी तरंगती जेट्टी नसल्याने पर्यटकांना  शिडाच्या बोटीमधून किल्ल्याजवळ सोडण्यात येते. भरतीच्या वेळी शिडाच्या बोटी नेहमी हेलकावे खात असतात. अशा वेळी विशेषतः महिलांना किल्ल्यावर उतरताना मोठी कसरत करावी लागते. भरतीच्या वेळी शिडाच्या बोटीतून किल्ल्याजवळ उतरताना नासिक येथील एका महिलेच्या पायाला मोठी दुखापत होऊन हाड मोडले होते. अशा छोट्या मोठ्या घटना टाळण्यासाठी या ठिकाणी तरंगती जेट्टी खूप आवश्यक आहे. पुरातत्व खाते व मेरी टाइम बोर्डाने उचित प्रस्ताव तयार करून तरंगती जेट्टी लवकरात लवकर उभारावी, अशी मागणी पर्यटक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील गड – किल्ल्यांचे आकर्षण इतिहासप्रेमींइतकेच सर्वसामान्यांना आहे. ज्याची आरमारावर सत्ता त्याची जगावर सत्ता ही धारणा छत्रपती शिवरायांची होती. त्या द्रष्टेपणातूनच महाराजांनी महाराष्ट्राच्या पाश्चिम किनारपट्टीवर पाच प्रमुख जलदुर्ग उभे केले, त्यामध्ये मुरूडच्या पद्मदुर्गचा समावेश आहे.  कथा, कादंबर्‍यांपेक्षा प्रत्यक्ष स्थल दर्शनाने गड किल्ल्यांचा इतिहास जास्त उमगतो. त्यामुळेच जंजिर्‍यात दरवर्षी 1 सप्टेंबर ते 31 मे या कालावधीत लाखो पर्यटक येतात.

जंजिरा किल्ल्याच्या तुलनेत पद्मदुर्ग आजही दुर्लक्षितच आहे. मुरूडपासुन तीन कि.मी अंतरावर समुद्रात उभ्या असलेल्या पद्मदुर्गचे दोन भाग पडतात. एक बालेकिल्ला तर दुसर्‍या खडकावर बांधलेला पडकोट किल्ला. ऐतिहासिक दस्ताऐवजानुसार इ. स. 1678 च्या सुमारास शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गाच्या बांधकामास सुरवात केली तर बांधकामाची समाप्ती संभाजी राजांच्या कारकीर्दीत झाली, असा उल्लेख आढळतो. सिद्दीच्या ताब्यात असलेल्या जंजिरा किल्ल्यावर करडी नजर ठेवण्यासाठी शिवाजी महाराजांनी पद्मदुर्गची उभारणी केली. या ऐतिहासीक पद्मदुर्ग किल्याकडे पुरातत्व खात्याने अक्ष्यम्य दुर्लक्ष केले आहे. खोल समुद्रात इतिहासाची साक्ष देणारा व मराठ्यांनी बांधलेला हा किल्ला असूनसुद्धा याचे संगोपन करण्यात पुरातत्व विभाग अपयशी ठरला आहे. येथे सुलभ प्रवासी वाहतूक होण्यासाठी पुरातत्व खात्याने कोणत्याही सोयी न केल्याने पर्यटकांना इच्छा असूनसुद्धा हा किल्ला पहाता येत नाही.

कोणतेही यांत्रिक बोट थेट पद्मदुर्ग किल्ल्यापाशी लागत नाही, त्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी एक छोटी बोट घ्यावी लागते तरीही किमान गुडघाभर पाण्यात उतरूनच किल्ल्यात पोहचता येते. पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्यात अगदी सहज उतरणे अथवा चढणे सोपे झाले तर या किल्ल्यावरसुद्धा पर्यटकांची संख्या वाढणार आहे. मांडवा बंदराप्रमाणेच या किल्ल्यावर जाण्यासाठी तरंगती जेट्टी केल्यास पर्यटनाचा ओघ मुरुडकडे वाढण्यास मदत होणार आहे. कमी खर्चात उपलब्ध होणारी तरंगती जेट्टी येथे खूप आवश्यक आहे. पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ला खुला आहे, परंतु तेथे उतरण्याची व्यवस्था सुलभ होणे खूप आवश्यक आहे. यासाठी पुरातत्व खाते व मेरी टाइम बोर्ड यांनी तातडीने उपाय योजना करणे खूप आवश्यक आहे.

पद्मदुर्ग किल्ल्यावर प्रवासी वाहतूक करण्यासाठी दोन शिडाच्या बोटींना परवानगी देण्यात आली आहे. आणखी दोन नवीन प्रस्ताव दाखल असून, त्या दोन बोटींनाही परवानगी देणार असल्याचे महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचे बंदर निरीक्षक हितेंद्र बारापत्रे सांगितले.

या पद्मदुर्ग किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्र असल्याने या किल्ल्यावर नेहमीच जोरदार वारे वाहत असतात. या किल्ल्यावर सुरळीत वाहतूक झाल्यास मोठा पर्यटक वाढणार असून, पर्यटकांना समुद्री सफरसुद्धा होणार आहे.

मुरुड हे पर्यटन स्थळ असल्याने येथे वर्षाला पाच लाखापेक्षा जास्त पर्यटक येत असतात. जवळच जंजिरा किल्ला असल्याने तेथेही पर्यटकांची संख्या जास्तच असते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्लाही पहाण्यासारखा असून, तरगंती जेट्टीची  व्यवस्था केल्यास या ठिकाणीसुद्धा मोठ्या संख्येने पर्यटक जाऊ शकतील. पर्यटक वृद्धीमुळे स्थानिकांचा स्वयंरोजगार वाढणार आहे,  असे सामाजिक कार्यकर्ते गिरीश साळी यांनी सांगितले. 

मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी सांगितले की, पुरातत्व खात्याने महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाला लेखी पत्र देऊन पद्मदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला केला आहे. तसेच पत्र तहसीलदार, पोलीस निरीक्षक व नगर परिषदेला द्यावे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना पद्मदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती होईल व पर्यटकांना कोणतीही समस्या निर्माण होणार नाही. पद्मदुर्ग किल्ला सुरु केल्यानंतर तेथे कर्मचारी नियुक्त करून पर्यटकांना माहिती फलक व इतिहास सांगणारे फलक लावण्यात यावेत, अशी मागणी सुर्वे यांनी केली आहे.

-संजय करडे, खबरबात

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply