Breaking News

पर्यटनाचा ब वर्ग

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन ही राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळे आहेत. दरवर्षी या तिन्ही ठिकाणांना राज्यभरातून लाखो पर्यटक भेट देत असतात, मात्र निधीआभावी या पर्यटनस्थळांचा पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अपेक्षित विकास होऊ शकला नव्हता. रस्ते, पाणी, वाहनतळ, प्रसाधानगृह, बगीचे यांसारख्या सोयीसुविधांची कमतरता या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत होती. नगरपालिकांचे मर्यादित उत्पन्न आणि जिल्हा विकास योजनेतून मिळणारा अपुरा निधी यामुळे पर्यटनाच्या अनुषंगाने अपेक्षित सोयीसुविधांची वानवा होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने तिन्ही केंद्रांना पर्यटनाचा ‘ब’ वर्ग दर्जा द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती, मात्र त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता. आता अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धनला राज्य सरकारने पर्यटनाचा ‘ब’ दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे तिन्ही ठिकाणच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल. या तिन्ही पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या निधीच्या माध्यमातून अंतर्गत जोडरस्ते, बागबगीचे, पर्यटकांना बसण्यासाठी सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वस्तुसंग्रहालय, विद्युतीकरण, वाहनतळ, संरक्षक भिंती, दिशादर्शक फलक यांसारखी कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. राज्यात पर्यटनस्थळांचे अ, ब आणि क अशा तीन विभागांत वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणानुसार पर्यटनस्थळांच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात असतो. ‘क’ दर्जातील पर्यटनस्थळांसाठी जिल्हा विकास योजनेमार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देत असते, तर ‘अ’ वर्गातील पर्यटनस्थळांना केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत असतो. ज्या पर्यटनस्थळांना दरवर्षी पाच लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात, सलग तीन वर्षे येथील पर्यटकांची संख्या कायम आहे, ज्या ठिकाणांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे, ज्याचे ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्व कायम आहे, त्या ठिकाणांना पर्यटनाचा ‘ब’ दर्जा दिला जातो. या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून दोन कोटी रुपयांपर्यंतचा निधी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. शासनाकडून निधी मिळाल्यास या पर्यटनस्थळांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येणार नाहीत. विस्तीर्ण समुद्रकिनारे, नारळ पोफळीच्या बागा, ऐतिहासिक कुलाबा, खंदेरी, उंदेरी किल्ले, प्राचीन मंदिरे, ज्यू संस्कृतीच्या पाऊलखुणा आणि ब्रिटिशांनी स्थापन केलेली दीडशे वर्षे जुनी भुचूंबकीय वेधशाळा यामुळे राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणून अलिबाग नावारूपास आले आहे. अलिबाग हे मिनी गोवा म्हणून नावारूपास आले आहे. जलप्रवासाच्या सुविधा असल्यामुळे अलिबाग तसेच जिल्ह्याच्या इतर भागात पर्यटनासाठी येणार्‍यांची  संख्या वाढत आहे. पूर्वी शनिवार-रविवारी किंवा सुटीच्या दिवशी पर्यटक यायचे. आता नेहमी अलिबागचा किनारा गजबजलेला असतो. मुरूडचा जंजिरा किल्ला, नवाबांचा राजवाडा, खोकरीच्या घुमटी, मराठा आरमाराचे ठिकाण असणारा पद्मदुर्ग किल्ला, फणसाड अभयारण्य, मुरूड आणि काशिदचे विस्तीर्ण समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षण आहेत. पेशवाईच्या पाऊलखुणा असलेल्या श्रीवर्धनला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. हरीहरेश्वर याच श्रीवर्धन तालुक्यात आहे. त्यामुळे येथे पर्यटक येत असतात. त्यामुळे तिन्ही केंद्रांना पर्यटन क्षेत्राचा ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता. आता शासनाने या तिन्ही पर्यटनस्थळांना ‘ब’ दर्जा दिला आहे. निधीअभावी  पर्यटनविषयक पायाभूत सुविधांच्या विकासावर मर्यादा येत होत्या. जिल्हा नियोजन समितीकडून काही प्रमाणात निधी मिळतो, पण तो अपुरा पडतो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सुविधा देता येत नाहीत. ‘ब’ दर्जा मिळाल्याने आता राज्य सरकारचा निधी अलिबागमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी उपलब्ध होऊ शकेल. राज्य सरकारने अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या तीन पर्यटनस्थळांना ‘ब’ दर्जा दिल्यामुळे येथे पायभूत सुविधा उपलब्ध होऊ शकतील हे खरे आहे, परंतु इतर बाबींकडेदेखील लक्ष द्यावे लागणार आहे. कोरोना व निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातून सावरण्याचा प्रयत्न हे व्यावसायिक करीत आहेत. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. अनेकांनी कंटाळून व्यवसाय थांबवला आहे. या जाचातून पर्यटन व्यावसायिकांची सुटका झाली पाहिजे. आलेला पर्यटक थांबला पहिजे. तरच पर्यटन व्यवसाय खर्‍या अर्थाने वाढेल.  जर निवास व भोजनाची चांगली सुविधाच नसेल, तर पर्यटक थांबणार नाही. त्यामुळे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांनादेखील काही सवलती दिल्या पाहिजेत. पर्यटन व्यवसाय वाढला पाहिजे, असे म्हणायचे आणि हा व्यवसाय करणार्‍यांवर 40 पट दंड आकारायचा हा कुठला न्याय आहे. गेली कित्येक वर्षे हे पर्यटन व्यावसायिक औद्योगिक दराने वीज द्यावी, अशी मागणी करीत आहेत. ती त्यांना मिळायलाच हवी. जे लोक पर्यटन व्यवसाय करतात, त्यांना काही सवलती मिळाल्या पाहिजेत. केवळ भिंती बांधल्या आणि दिशादर्शक फलक लावले म्हणजे पर्यटन वाढेल असे नाही.

-प्रकाश सोनवडेकर

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply