ग्रामसेवकांच्या बदल्यांमुळे ग्रामपंचायतींची कामे रखडली
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
तालुक्यात 53 ग्रामपंचायती असून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकावर अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यातच ग्रामसेवकांच्या होणार्या सततच्या बदल्यांमुळे कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींची विकासकामे रखडली आहेत.
कर्जत तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांवर एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींंची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक गावांत ग्रामसेवक उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी विकासकामांचाही खोळंबा होत आहे. सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या त्या ग्रामसेवकावर असते, परंतु काही ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक कामे मुदतीत पूर्ण होत नाहीत.
त्यामुळे ग्रामसेवकांविरुद्ध तक्रारींचे प्रमाण वाढू लागले आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्य तेथील ग्रामसेवकावर दबाव टाकून कामात विघ्न निर्माण करतात, तर काही ठिकाणी ग्रामसेवक इतरांचे ऐकून चुकीच्या कामाला खतपाणी घालत असल्याचे प्रकार कर्जत तालुक्यात दिसून येत आहेत. तालुक्यातील नेरळ आणि हालिवली ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, उपसरपंचामध्ये वाद निर्माण होऊन तेथे ग्रामसेवकाला नाचविण्याचा प्रकार सुरू आहे. परिणामी ग्रामसेवकाला एका ग्रामपंचायतीचाच कारभार दिला, तर ग्रामस्थांचे प्रश्न सोडविता येऊन कामकाजासाठीही वेळ देता येईल, अशी मागणी होत आहे.
ग्रामसेवकाला त्यांच्या नियमाप्रमाणे काम करू द्यायला हवे, तसेच ग्रामसेवकाने शासनाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे नियमात राहूनच काम केले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालू नये.
-बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, कर्जत