श्री सदस्यांची स्वच्छता मोहीम
रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा-चौलच्या मुख्य रस्त्यावर निरूपणकार पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने श्री सदस्यांनी नुकतीच श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबविली. या वेळी श्री सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन श्रमदान केले. या स्वच्छता मोहिमेमुळे रेवदंडा व चौलचा मुख्य रस्ता चकाचक झाला आहे.
निरूपणकार पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वच्छता मोहिमेस सकाळी सात वाजता रेवदंडा मोठे बंदर ते चौल मुख्य रस्त्याच्या स्वच्छतेने प्रारंभ करण्यात आला. या वेळी श्री सदस्यांनी घमेले, फावडे, कुदळ तसेच गवत कापण्याच्या मशिनच्या मदतीने स्वच्छता केली. श्री सदस्यांचे असंख्य हात एकत्र येऊन त्यांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
या वेळी रस्त्यावरील केरकचर्यासह ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तसेच गवत साफ करून जमा झालेला कचरा एकत्रित करण्यात येत होता. श्री सदस्यांनी रेवदंडा मोठे बंदर, आगरकोट परिसर, हरेश्वर स्टॉप, रेवदंडा बाजारपेठ, रेवदंडा को. ए. सो. हायस्कूल परिसर ते चौल रामेश्वर, चौलनाका आदी परिसरात श्रमदानाने स्वच्छता केली. रेवदंडा व चौल रस्त्यावरील ठिकठिकाणी वाढलेली झाडेझुडपे तसेच गवत काढण्यात आल्याने रस्त्याला दुतर्फा वेगळाच लूक आला. श्री सदस्यांनी जमा केलेला केरकचरा, गवत व झाडांच्या तुटलेल्या फांद्या एकत्रितपणे माल वाहतूक टेम्पोमध्ये भरण्यात येऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.