तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन व लक्ष्मी पब्लिक स्कूल, सुकापूर आणि वाय. एम. टी. होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज-हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने तसचे पी. जी. इन्स्टिट्युट व राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत सुकूपर येथे मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथीक उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सात दिवसीय शिबिर असून रविवार (दि. 21) ते शनिवार (दि. 27) पर्यंत हे शिबिर असणार आहे. या शिबिरात वंचित ग्रामीण भागातील लोक, आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. मधुमेह तपासणी, इसीजी तपासणी, दंत चिकित्सा, बाल चिकित्सा, डोळे तपासणी, आहार विषयी, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्यांवर व संसर्गजन्य रोगांवर मार्गदर्शन देण्यात आले. आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
या शिबिराच्या उद्घाटनाच्या वेळी शिबिराचे आयोजक पालीदेवद (सुकापूर) ग्रामपंचायतीचे सरपंच योगिता पाटील, ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील यांच्यासह जि. प. सदस्य अमित जाधव, सुकापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच अशोक पाटील, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, राजेश पाटील, भरत म्हस्कर, ग्रा.पं. सदस्य पूनम भगत, प्राची जाधव आदी उपस्थित होते.