कामोठे : वार्ताहर
दिशा महिला मंच आयोजित लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने रविवारी (दि. 24) कामोठेतील श्रद्धा अकॅडमी येथे ‘संकल्प नेत्रदानाचा’ उपक्रम आयोजित केला होता. या वेळी 105 नेतत्रदात्यांनी मारणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. त्यासाठी रीतसर ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून सर्व फॉर्मेलिटी पूर्ण केल्या. उपस्थितांना डॉ. तन्वी खोसला यांनी नेत्रदानाचे महत्त्व व गरज यावर योग्य मार्गदर्शन केले, तसेच डॉ. वैशाली जवादे यांनी नेत्रदान व देहदान कुठे व कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन केले. रंजना सडोलीकर यांनी उपक्रमाचे कौतुक करीत जास्तीत जास्त लोकांनी नेत्रदान करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. खूप दिवसापूर्वी नेत्रदान करावे असा विचार फक्त मनात घोळत होता, पण आज दिशा व्यासपीठमार्फत तो संकल्प पूर्ण झाला याचा आनंद नेत्रदात्यांच्या चेहर्यावर दिसत होता आणि याचे मनोमन समाधान वाटते, असे व्यासपीठच्या संस्थापक अध्यक्ष निलम आंधळे यांनी सांगितले. या उपक्रमाला कामोठे कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव, निरव नंदोला, प्रशांत कुंभार, अमित गुटुकडे, राहुल शिंदे, संगीता राऊत, जयश्री झा उपस्थित होते. संस्थापक निलम आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली खुशी सावर्डेकर, मनीषा कोचळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम कामोठे येथे यशस्वीरीत्या झाला.