प्रवाशांसह वाहकांवर कारवाई करण्याची मागणी
पनवेल : वार्ताहर
पनवेलमध्ये बसथानकातील बसवर मास्क नाही, प्रवेश नाही असे फलक लावण्यात आले आहे, मात्र प्रत्यक्षात मास्कचे गांभीर्य कोणालाच दिसत नाही. त्यामुळे कोरोना महामारीचे गांभीर्य न घेणार्या प्रवासी व वाहकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जनजागृती करण्यासाठी मोठे फलक, बॅनर ठिकठिकाणी लावलेले आहेत. ते वाचून नागरिक प्रवाशांनी मास्क वापरावा, जेणे करून कोरोना संसर्ग कमी होईल, परंतु त्यांचे फारसे गांभीर्य घेताना काही नागरिकांना दिसत नाही. तसेच बस चालकाचा मास्क हनुवटीलाच लावलेला पाहायला मिळाला.
मास्क नसलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. किंवा दंडात्मक कारवाई करण्यात यावी. प्रवाशांना बसमध्ये विनामास्क प्रवेश देणार्या वाहकांविरुद्ध कारवाई करण्यात यावी. जेणेकरून मास्क नाही प्रवेश नाही या वाक्याला, सूचनेला हरताळ फासला जाणार नाही, अशी मागणी सुशिक्षित, सुजाण नागरिकांतून होत आहे.
पनवेल बसस्थानकावर बसमध्ये प्रवेश कारण्याकरीता प्रवाश्याची गर्दी होत असून या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचे पाहायला मिळत आहे.