पनवेल : प्रतिनिधी
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध जाहीर केले आणि प्रत्यक्षात मात्र ’ब्रेक दि चेन’च्या नावाखाली संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारने घातला असल्याने तसेच वीकेण्डला कडक लॉकडाऊन असताना त्याआधीच दुकानांचे शटर खाली करायला लावल्याने व्यापार्यांसह नागरिकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. त्या अनुषंगाने आज खांदा कॉलनी येथील व्यापार्यांनी आंदोलन करीत ठाकरे सरकारचा निषेध केला. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या आंदोलनात व्यापारी, दुकानदार, छोटे व्यावसायिक व जनतेचे हाल करू नका, असे राज्य शासनाला आवाहन करतानाच राज्य सरकारने जनतेचे, छोट्या व्यापारी, दुकानदारांचे हाल थांबावेत, जे काही कडक निर्बंध लावले आहेत ते मागे घ्यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. या वेळी नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीता पाटील, युवा नेते अभिषेक भोपी, नवनाथ मेंगळे, रमण पुरस्कर, शशिकांत इंगळे, चेतन जाधव यांच्यासह व्यापारी असोसिएशन, नाभिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनात ‘लॉकडाऊन हटाओ, व्यापारी बचाओ’ असे फलक हातात घेऊन व्यापार्यांनी संताप व्यक्त केला. तर पनवेल तालुका नाभिक समाज मंडळाने ’आम्हाला भीक मागायला लावू नका’,’आम्ही उपाशी मरायचे का? अशा आशयाचे बॅनर झळकवून राज्य सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. लॉकडाऊनविरोधात नवीन पनवेल, खारघर आणि कळंबोलीतील व्यापार्यांनीही मंगळवारी आंदोलन केले होते. अशा पद्धतीने लॉकडाऊन लावणे योग्य नसल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. एक महिना दुकाने व व्यवसाय बंद राहणार असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीला दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. अचानक दुकाने बंद केल्याने तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. दुकानाचे भाडे, नोकरांचा पगार, कर्जांचे हप्ते या सर्व समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याने व्यापारी हवालदिल झाल्याचे चित्र आहे. असे असतानाही ठाकरे महाविकास आघाडी सरकार मात्र निद्रास्त अवस्थेत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होताना दिसत आहे.
पार्सल सेवा रात्री 11 पर्यंत देण्याच्या परवानगीची मागणी
अलिबाग : हॉटेल व्यवसायिकांना रात्री 11 वाजेपर्यंत पार्सल सेवा देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी अलिबागमधील हॉटेल आणि रेस्टोरंट वेलफेअर असोसिएशनच्या वतीने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे रेस्टोरंट आणि हॉटेल चालक अडचणीत आले आहेत. हीबाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांना असोसिएशनच्या वतीने मंगेश शिंदे यांनी निवेदन दिले आहे.
कडक निर्बंधांमुळे होणार उपासमार
दरम्यान, पनवेलमधील शहराच्या मुख्य ठिकाणी दुकान मालक, व्यापारी, व्यावसायिकांनी राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधांसह लॉकडाऊनचा तीव्र निषेध केला. महाविकास आघाडी सरकारने लादलेल्या लॉकडाऊनमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, सरकारने निर्णयात बदल केले नाहीत तर आंदोलन आणखीन तीव्र पद्धतीने करण्यात येईल, असा इशाराही व्यापार्यांनी दिला. या आंदोलनात संजय जैन, पवन सोनी, राजकुमार सचदेव, हस्तीमल जैन, किर्ती डेडीया, छतरमल मेहती आदी सहभागी झाले होते. व्यापार्यांनी बॅनर हातात घेऊन निषेध व्यक्त केला.