मुंबई-बंगळुरू संघांमध्ये सलामीची लढत
चेन्नई ः वृत्तसंस्था
जगातील सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धा आयपीएलच्या 14व्या हंगामाला शुक्रवार (दि. 9)पासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेतील सलामीची लढत गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
साखळी फेरीत प्रत्येक संघ चार मैदानावर सामने खेळतील. 56 साखळी सामन्यांतील प्रत्येकी 10 सामने चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि बंगळुरू येथे होणार आहेत, तर अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी आठ सामने होतील. या वर्षी होणार्या आयपीएलचे वैशिष्ट्य म्हणजे कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही सामना खेळणार नाही. प्ले ऑफच्या लढती आणि अंतिम सामना जगातील सर्वांत मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
कोरोनाचे आव्हान
यंदा आयपीएलपुढे वैश्विक महामारी कोरोनाचे आव्हान आहे. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आयपीएलमधील काही खेळाडू, तसेच कर्मचार्यांनाही कोविड-19ची लागण झालेली आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वी करण्याचे आव्हान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएल संयोजन समितीला पेलावे लागणार आहे.