Breaking News

रोह्यात कुंडलिका नदीला पूर

रोहे ः प्रतिनिधी – तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावून सोमवारीही जोर कायम ठेवल्याने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. रोह्याची जीवन वाहिनी कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली असून, पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने कुंडलिका नदीच्या काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर रोह्यात रविवारपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. रोहा अष्टमी पुलाला पाणी लागल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असून उदघाटन न झालेल्या नव्या पुलावरून वाहतूक सुरु आहे. नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तसेच वाहतूक पोलीस या पुलाच्या दोन्ही बाजुला तैनात करण्यात आले आहेत. कुंडलिका नदी भरून वाहू लागल्याचे  दृश्य पाहाण्यासाठी नव्या पुलावर बघ्यांची गर्दी होत असून हा सेल्फी पाँईट बनला आहे.

गांधारी पूल पाण्याखाली; महाड-रायगड मार्ग बंद

महाड : प्रतिनिधी – तालुक्यात पावसाने पुन्हा जोरदार सुरूवात केली असून, सोमवार सकाळपासूनच तालुक्यातील विविध भागात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे महाड-रायगड मार्गावर गांधारी नदीचे पाणी येवून हा मार्ग बंद झाला आहे. तर मुंबईकडे जाणारा गांधारी पुल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसापासून महाडमध्ये पाऊस जोमाने पडत असून या पावसामुळे तालुक्यातील गांधारी, काळ, आणि सावित्री या नद्या दुथड्या भरून वाहू लागल्या आहेत. तालुक्यातील रायगड परिसर, वाळण आणि वरंध, महाबळेश्वर आणि पोलादपुर खोर्‍यात पावसाचा जोर अधिक असल्याने आणि तेथील पाणी सावित्री, गांधारी, काळ या नद्यांना आल्याने महाड शहरासह परिसरात पुराचे पाणी भरले आहे. सोमवारी दस्तुरी नाका ते रायगड मार्ग यादरम्यान सावित्री नदीचे पाणी रस्त्यावर आले. तर तेटघरजवळ गांधारी नदीचे पाणी रस्त्यावर आले होते. महाड शहरातून मुंबईकडे जाणार्‍या मार्गावरील पुल पाण्याखाली गेल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने महाड तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसले तरी महसूल आणि आपत्कालीन पथक संपूर्ण तालुक्यात लक्ष ठेवून आहेत. महाबळेश्वर परिसरात पावसाचा जोर अधिक असून त्यामुळे सावित्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोमवार संध्याकाळपर्यंत महाड परिसरात 738 मिमी पाऊस पडला असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply