पनवेल : प्रतिनिधी
स्पर्धा परिक्षा तसेच अन्य परीक्षा देण्यासाठी ज्या परीक्षार्थीना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहवयाचे आहे, अशा परिक्षार्थींना वीकेण्ड लॉकडाऊन (शनिवार-रविवार लॉकडाऊन) कालावधीतसुद्धा आवश्यक प्रवास करण्यास परवानगी असेल. परिक्षार्थ्यांजवळील हॉल तिकीट हा प्रवासासाठीचा वैध पुरावा मानला जाईल, तसेच प्रत्येक परीक्षार्थींच्या सोबत एकास प्रवासास परवानगी असेल. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोविड 19 चे प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे आदेश लागू केले आहेत. त्यांस अनुसरून गुरुवारी काही अतिरीक्त सूचना जाहीर केल्या आहेत. ऑनलाइन अन्न पुरवठा वितरीत करणार्या आणि अत्यावश्यक सेवेतील अन्न पुरवठाधारक उदा. झोमॅटो, स्विगी आदींना आठवड्यातील सर्व दिवस 24 तास सेवा पुरविण्यास परवानगी आहे. याचबरोबर वीकेण्ड लॉकडाऊनदरम्यान हॉटेलमधून नागरिकांना स्वत: जाऊन पार्सल घेण्यास परवानगी असणार नाही, परंतु रेस्टॉरंट किंवा खानावळीमधून पार्सल पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. वीकेण्ड लॉकडाऊनदरम्यान फळ विक्रेत्यांसह रस्त्याच्याकडेला खाद्यपदार्थांची विक्री सुरू ठेवता येतील, परंतू केवळ पार्सल सेवा देता येईल. खाद्यपदार्थ विक्री करणार्या स्टॉलजवळ उभे राहून खाता येणार नाही. डोळ्यांचे सर्व दवाखाने आणि त्या अनुषंगाने चष्म्यांची दुकाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कालावधीत सुरू राहतील. हे आदेश 30 एप्रिलपर्यंत लागू राहतील. या आदेशाचे उल्लंघन करण्यार्यांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल.