Breaking News

महाराष्ट्रासाठी भाजप उपलब्ध करून देणार 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन; प्रवीण दरेकर यांची घोषणा

दमण : वृत्तसंस्था

राज्यात निर्माण झालेला रेमडेसिवीरचा तुटवडा व रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी सोमवारी (दि. 12) दमणला धाव घेतली. दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपकडून 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याचेही दिसून येत आहे. राज्यातील रेमडेसिवीरचा तुटवडा पाहता विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही औषध उत्पादक कंपन्यांशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने दमण येथील ग्रुप फार्मा प्रा. लि. या कंपनीशी चर्चा करण्यासाठी सोमवारी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व भाजप आमदार प्रसाद लाड यांनी दमणला धाव घेतली. ग्रुप फार्मसीचे मालक अंशू यांनी महाराष्ट्राला लागेल तितका रेमडेसिवीरचा साठा देण्याचे आश्वासन दिले असून, देशभरात वाटप करण्याची परवानगी मिळवण्यासाठी केंद्र सरकारला अर्जही केला आहे. केंद्राकडून परवानगी मिळताच महाराष्ट्रात रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप सुरू करण्यात येईल, अशी माहिती दरेकर यांनी दमण येथून दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply